बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित अरुण राठोड याच्या घरी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. अरुण राठोड याच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम याची चोरी झाली आहे. अरुण राठोड याच्या घरातून एकूण 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Arun Rathod House Theft by Thieves)
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील अरुण राठोड याच्या घरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अरुण आणि त्याचं कुटुंब घराला कुलूप लावून गायब झालं होतं. याचाच चोरट्यांनी फायदा घेतला. अरुणच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 80 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस याबाबतचा तपास करीत आहे.
अरुण राठोडचं कुटुंब चार दिवसानंतर घरी
पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव आल्यानंतर अरुण आणि त्यांचं कुटुंब बेपत्ता झालं होतं. त्याच्या घराला गेल्या चार दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, चार दिवसानंतर अरुणचे कुटुंबीय गावात आले आहेत. मात्र, अरुण अजूनही बेपत्ता आहे. तो कुटुंबासोबत आलेला नाही. त्यामुळे अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल केला जात आहे.
दोन दिवसात माध्यमांसमोर येईल
अरुणचं कुटुंब गावात आलं असलं तरी अरुण मात्र अद्याप आलेला नाही. अरुण दोन दिवसात माध्यमांसमोर येईल, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. मात्र, अरुण नेमका कुठं आहे? कुणासोबत आहे? तो समोर का येत नाही? असा सवाल करण्यात आला असता त्यांच्या नातेवाईकांनी बोलण्यास नकार दिला.
कसं आहे अरुणचं गाव?
अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या टीमने थेट त्याचं गावच गाठलं. त्याच्या गावात जाऊन आधी त्याच्या घराला भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या घराला कुलूप होती. अरुण घरी नव्हता आणि त्याचं कुटुंबही गावात नव्हतं. गावातील लोकांनाही त्याचं कुटुंब कुठं गेलं याची माहिती नाही. कोणीही काही सांगायला तयार नाही. त्यामुळे राठोड कुटुंब गेलं कुठं? असा सवाल केला जात आहे. आमची टीम धारावती तांड्याला पोहोचली. हे गाव अत्यंत छोटंसं दिसलं. पण गावात वर्दळ मोठी होती. आम्ही संत सेवालाल चौकात पोहोचलो. इथं गौर सेनेचा बोर्ड लावलेला होता. गावचे रस्ते कच्चे होते. एकही सिमेंटचा रस्ता दिसला नाही. चौकाच्या बाजूला किराणाचं दुकान होतं. दुकानाभोवती उघडी नागडी लहान पोरं खेळत होती. आम्ही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर गावात काही गाड्या दिसल्या. रस्त्याच्या दुतर्फा मातीची घरं दिसली. गावात माणसांची वर्दळ दिसत होती. शेळ्या मेंढ्यांचे आवाज आणि कूत्र्यांची ये जाही सुरू होती. गावात काहीच घडलं नाही, अशीच परिस्थिती जाणवत होती. (Arun Rathod House Theft by Thieves)
संबंधित बातम्या :
संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; अनिल देशमुख यांचं मोठं विधान
भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल
कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?
फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!