अरविंद सावंत इम्पोर्टेड माल म्हणतात, ही त्यांची महिलांबाबतची भाषा?; संजय शिरसाट भडकले

| Updated on: Nov 01, 2024 | 12:20 PM

शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या "इम्पोर्टेड माल" या अपशब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सावंत यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. शिंदे गटाने याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अरविंद सावंत इम्पोर्टेड माल म्हणतात, ही त्यांची महिलांबाबतची भाषा?; संजय शिरसाट भडकले
संजय शिरसाट
Image Credit source: social media
Follow us on

शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अपशब्द वापरले आहेत. अरविंद सावंत यांनी इम्पोर्टेड माल असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यावरून शिंदे गट आणि भाजप चांगलाच संतप्त झाला आहे. शायना एनसी यांना अरविंद सावंत इम्पोर्टेड माल म्हणतात, हीच का त्यांची महिलांबाबतची भाषा?, महिलांचा हाच का सन्मान? असा संतप्त सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते.

ते अरविंद सावंत शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हणतात ही यांची महिलांबाबत भाषा आहे आणि हे ह्यांचे संस्कार आहेत. आदित्य ठाकरे यांचा नेता आहे. या लोकांना तारतम्य राहिले नाही. उद्धव साहेब सहन करतात तर आम्ही काय बोलावे? असा संताप संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

नका करू असे फोन…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रश्मी शुक्ला डीजी झाल्यापासून संजय राऊत त्यांचा तिरस्कार करत आहेत. भीती वाटत असेल तर फोनवर असं काही बोलू नका की ज्यामुळे भीती वाटेल. तुमचे फोन कोण कशाला टॅपिंग करणार? तुमच्यासारख्यांचे फोन टॅपिंग करायला कुणालाही वेळ नाही, असं सांगतानाच सध्या ठाकरे गटात महिलांचा अवमान करण्याचा पॅटर्न सुरू आहे, असा हल्लाच संजय शिरसाट यांनी केला आहे.

राऊत चेक नाक्यावर होते का?

आम्ही कुणाला किती पैसे पोहोचवतोय हे पाहायला संजय राऊत काय चेक नाक्यावर उभा होता का? आरोप करणे हे महामूर्खपणाचं लक्षण आहे. यांना पैसे, टक्केवारी आणि ब्लॅकमेलिंग हेच शब्द माहीत आहेत. बाकी नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.

आम्ही घर फोडत नाही

यावेळी त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलंय. संजना जाधव या जिल्हा परिषद सदस्य आहे, त्यांनी सामाजिक काम केलं आहे. म्हणून त्यांना तिकीट दिलंय. आम्ही कुणाचे घर फोडत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तात्काळ कारवाई करा

दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांच्या विधानावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही संताप व्यक्त केला आहे. मुंबादेवी विधानसभा क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबद्दल उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागितली पाहिजे. कारण एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलेली आहे, परंतु त्याच्या विपरीत काम अरविंद सावंत यांनी केले आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय