Bachchu Kadu: मंत्र्यापेक्षा आमदारच बरा होतो, आता फसून गेल्यासारखं वाटतंय; बच्चू कडूंची खंत

| Updated on: May 29, 2022 | 7:18 PM

Bachchu Kadu: शाळेला टाळा ठोकता मात्र मंदिर, मशीद, विहाराला टाळा ठोकता का? असा सवालही त्यांनी गावकऱ्यांना केला, धार्मिक स्थळांना देणगी देतो त्याप्रमाणे शाळेलाही देणगी द्यावी. केवळ सरकारवरच निर्भर राहू नये.

Bachchu Kadu: मंत्र्यापेक्षा आमदारच बरा होतो, आता फसून गेल्यासारखं वाटतंय; बच्चू कडूंची खंत
राज्यमंत्री बच्चू कडू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम: आपल्या बिनधास्त आणि स्पष्टेवक्तपणाबाबत प्रसिद्ध असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुन्हा एकदा बिनधास्त विधान केलं आहे. मी आमदार असताना चांगले काम करत होतो. आता या सरकारमध्ये राज्यमंत्री झालो. मी मंत्र्यापेक्षा आमदारच चांगला होतो. मंत्री होऊन फसून गेल्यासारखं वाटतंय, अशी खंत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोलून दाखविली. नाथ समाजाच्या वैदर्भीय मेळाव्याला कारंजा इथं आले असता ते बोलत होते. चांगला अधिकारी असेल तर डोक्यावर घेऊ. नाहीतर झोडून काढू, असं बेधडक विधानही त्यांनी केलं. यावेळी महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर (central government) हल्लाबोल केला. टोमॅटोला पेट्रोलचा भाव आला आहे. भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. याला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच भाजीपाल्याचे दर वाढले तर मीडियाची ब्रेकिंग न्यूज होते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

पेट्रोलच्या भावात टोमॅटो झाले असून भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने महागाईवर काय उपाय योजना केल्या असं राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारले असता, टोमॅटोचे भाव वाढले आहेत. यापेक्षाही जास्त वाढले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे दर वाढले की लगेच मीडियाची ब्रेकिंग न्यूज होते. गरिबाला आपण राशनच्या माध्यमातून स्वस्त धान्य देतोय. मात्र सातवा वेतन लागू असणाऱ्यांनी टोमॅटो, भाजीपाला महागला तर बोलू नये, असं बच्चू कडू यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे राज्यातील मीडिया भोंगा, हनुमान चालीसा दाखवत आहेत. 25 हजार विद्यार्थ्यांनी नोकरी नसल्याने आत्महत्या केल्याची बातमी कधीच ब्रेकिंग झाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

मोदींवर अशी टीका केली तर चालेल का?

यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्राने आजपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सारखा लुच्चा मुख्यमंत्री बघितला नाही, अशी टीका किरीट सोमय्या यांनीकेली होती. या टीकेचा बच्चू कडू यांनी समाचार घेतला. ही भाजपची संस्कृती आहे का? आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशी टीका केली तर चालेल का? या बोबड्यावर जास्त लक्ष देऊ नका, अशी टीकाही त्यांनी केली. मात्र राणा दाम्पत्यांबाबत विचारले असता बच्चू कडू भडकले. त्यांनी त्यावर काही बोलण्यास नकार दिला.

धार्मिक स्थळांना देणगी देतो, तशी शाळांनाही देणगी द्या

कामारगाव येथे एका कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं. गावाच्या विकासासाठी सर्व तरुणांनी मंदिर, मशीद, हनुमान चालीसा याकडे न लक्ष देता आपली पुढची पिढी घडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेकरीता एकत्र येऊन सुधारणा करावी. आपणही या कार्यात एक लाख रुपये देणगी देऊ अशी घोषणा त्यांनी केली. सोबतच शाळेला टाळा ठोकता मात्र मंदिर, मशीद, विहाराला टाळा ठोकता का? असा सवालही त्यांनी गावकऱ्यांना केला, धार्मिक स्थळांना देणगी देतो त्याप्रमाणे शाळेलाही देणगी द्यावी. केवळ सरकारवरच निर्भर राहू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याकरता सर्व समाजातील नागरिकांनी पुढे येऊन शाळा सुधारण्याकरता योगदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.