नाशिक : दुचाकीला रिक्षाचालकाने कट मारला म्हणून दुचाकीवर असलेल्या दोघांनी बदला म्हणून थेट ऑटोरिक्षाच (Auto Rickshaw) जाळून टाकली आहे. नाशिकच्या (Nashik) अमृतधाम परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान रिक्षाचालक रोहित रमेश नाईक यांनी आडगाव पोलीस (Nashik Police) ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार हिरावाडी येथे राहणाऱ्या अनिल तांदळे आणि विजय फसाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित म्हणून त्यांची नावे दाखल आहेत. रिक्षाचालक रोहित नाईक सोमवारी रात्री प्रवासी सोडून आपल्या घराकडे निघालेले असतांना संबंधित प्रकार घडला आहे. नाईक यांच्या एमएच 15 एफयू 8266 या रिक्षाचा कमलनगर बस स्टॉप येथे संशयित अनिल तांदळे आणि विजय फसाळे यांच्या गाडीला धक्का लागला होता.
रिक्षाचा गाडीला धक्का लागला त्यावेळी रिक्षाचालक नाईक आणि दुचाकीवर असलेल्या तांदळे आणि फसाळे यांच्यात वाद झाला होता.
आपापसात झालेल्या वादावर दोघांकडून घटनास्थळी पडदा पडला होता. यावेळी रिक्षाचालक नाईक हे घरी निघून गेले होते.
मात्र, नाईक हे घरात असतांना बाहेर उभी असलेल्या रिक्षावर बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून दिले आणि आग लावली. नंतर नाईक यांचा दरवाजा वाजवून निघूल गेले.
नाईक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी लागलीच पेटलेली रिक्षा विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेत रिक्षाचे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेनं मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून रिक्षा पेटवणाऱ्यांना पोलीसांनी धडा शिकवावा अशी मागणी होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आडगाव पोलीस याबाबत अधिकचा तपास करीत आहे.