नागपूर : ‘गृहमंत्री अनिल देशमुख काका’ (Anil Deshmukh) काटोल मतदारसंघातून गायब झाले आहेत, असं म्हणत पुतणे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी घरचा आहेर दिला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख या राजकीय क्षेत्रातील काका-पुतण्यामधली ‘तू तू मै मै’ पुन्हा उघड्यावर येण्याची चिन्हं आहेत. अनिल देशमुख निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं सांगत आशिष देशमुखांनी आपण लढण्याचा इरादा व्यक्त केला. (Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)
“अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” असं आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परवानगी घेऊन मंदिर, शाळेत क्लासेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काटोलमध्ये विधानसभा मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचं सांगत आशिष देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. “राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वच मतदारसंघात फिरतात, काँग्रेसच्या असो, किंवा शिवसेनेच्याही. पक्षवाढीसाठी सर्वांनाच वाव आहे. आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आशिष देशमुख हे नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत. (Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोल मतदारसंघातून विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले काका अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी 2018 मध्ये आमदारकी आणि भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत. रणजीत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रिपद सांभाळले आहे.
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी
वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर
(Ashish Deshmukh taunts Anil Deshmukh says later missing from Katol)