शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गटाला लोकसभा निवडणूकात म्हणाव्या तशा जागा मिळालेल्या नाहीत. शिवसेनेच्या उद्धव गटाने राज्यभरात 22 लोकसभा जागा निवडल्या त्यापैकी 9 जागा ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटात थोडीशी नाराजी आहे. त्यातच आता ठाकरे गटाला असलेली सहानुभूती संपल्याने आता विधानसभेत खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी खास जम्बो प्लान आखला आहे.
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यातच शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केले होते आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सामील होऊन आघाडी सरकार कोसळवले होते. शिवसेना फोडून एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे पक्षाचे अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या फूटीनंतर पहिल्याच परीक्षेला लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे यांना जागा कमी मिळाल्याने तसेच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील उत्तर- पश्चिम आणि कोकणातील दोन जागा गमावल्याने शिवसेना थोडी बॅकफूटवर गेल्यासारखे वातावरण आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांत चेतना आणि ऊर्जा येण्यासाठी आता रणशिंग फुंकले आहे. उद्धव ठाकरे आता 7 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. संभाजीनगरात ‘शिवसंकल्प’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला असून 6 जुलैला छत्रपती संभाजी नगरदौऱ्यापासून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीची महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष तयारी करत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसला विदर्भासह 13 जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा उद्धव ठाकरे असतील असे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते शरद पवार यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे उद्धव ठाकरे येत्या दौऱ्यात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांची मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांना न्याय देणार – गद्दारांचा कडेलोट करणार असे या ‘शिव संकल्प’ मेळाव्याच्या आमंत्रण पत्रिकेचे शीर्षक आहे. त्यामुळे संभाजीनगरातील विधानसभांसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. रविवारी 7 जुलै रोजी स.10 वाजता संभाजीनगरातील सूर्या लॉन्स बीड बायपास येथे शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे.