राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 जागा महायुतीने जिंकल्या. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. 132 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर गुरुवारी नव्या मंत्रिमंडाळाचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. संविधान बदलणार असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता विकास हाच आमचा ध्यास आहे. सर्व जाती- धर्माच्या लोकांना समान न्याय दिला जाईल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. शरद पवार यांना तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन केला होता. मात्र तरी देखील महाविकास आघाडीतील नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी राग आहे. पण आम्हाला विकास करायचा आहे. आमचं विकासाचं ध्येय आहे. महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहायला पाहिजे होते, मात्र ते राहिले नाहीत. यातून हेच दिसून येत की त्यांचा संविधानाला विरोध आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्या सोलापूर लाँग मार्चवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. लोकशाहीनं तो अधिकार त्यांना दिला आहे. ईव्हीएम मशीन त्यांनीच आणलं. जेव्हा लोकसभेत त्यांना यश मिळालं तेव्हा ईव्हीएमविरोधात आंदोलन केलं नाही. असा टोला यावेळी आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.