मध्यरात्री दोनच्या सुमारास अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात हल्ला झाला. हल्लेखोर आधीच त्याच्या घरात दबा धरून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संधी मिळताच त्यानं सैफ अली खानवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चाकूनं वार करण्यात आल्यामुळे सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आता या प्रकरणात पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानं ट्विट करत “सैफ अली खानवरील हल्ला हा पहिलाच प्रसंग नाही, भारतामध्ये मुस्लिम हिरोंवर हल्ले होत आहेत.” असं म्हटलं आहे.
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकारच्या घटनांसाठी हिंदू महासभेला जबाबदार धरलं आहे.
नेमकं काय म्हणाले चौधरी?
“सैफ अली खानवरील हल्ला हा पहिलाच प्रसंग नाही, भारतामध्ये मुस्लिम हिरोंवर हल्ला होत आहे.” “सलमान खानवरही हल्ला झाला होता. हिंदू महासभेने कट रचून सलमानवर हल्ला केला होता.” “जिथे जिथे हिंदी आणि उर्दू भाषा बोलली जाते, तिथे हे सर्व अभिनेते ओळखले जातात.”“कोणालाही स्वतःला सुरक्षित वाटत नाही.” “या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्याची निंदा केली पाहिजे.” असं फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.
सैफला उद्याच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
दरम्यान आज 11.30 वाजता शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर सैफ अली खानला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या निगरणीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे. ICU मधून बाहेर काढल्यानंतर मुंबई पोलीस सैफ अली खान यांचं स्टेटमेन्ट नोंदवून घेणार आहेत, त्याला उद्या लगेचच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास), घरफोडी तसेच रात्रीच्या वेळी घोरपडी करण्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीच्या उद्देशानं हल्लेखोर घरात घुसल्याचा पोलिसांना संशय आहे.