मुंबई : शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेच मुंबई मनपातील कार्यालय हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. विनायक राऊत म्हणाले, मनपा निवडणुका झाल्या नाहीत. लोकांची गैरसोय होते. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींची पक्ष कार्यालयं उघडी ठेवायला सांगितली. त्यानुसार शिवसेना कार्यालय पक्ष येथे आहे. इतर पक्षाची कार्यालयं येथे आहेत. प्रत्येक पक्षाचे नगरसेवक येथे येतात. आपआपल्या मतदारसंघातील कामं करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीची कामं सुरू असताना काल गद्दार गटाचे खासदार आणि दहाबारा टोळके याठिकाणी आले. शिवसेना कार्यालयात जबरदस्तीनं घुसले. हे कार्यालय त्यांनी हायजॅक करायचं ठरविलं होतं. ते आमच्या नगरसेवकांनी उधळून लावलं. त्यांची इथून हकालपट्टी केली गेली. प्रशासनानं ही सर्व कार्यालयं बंद केलेली आहेत. त्यामुळं आयुक्त चहल यांची भेट घेतली. कार्यालय उघडं ठेवणं किती आवश्यक आहे, हे सांगितलं आहे. ते सहानुभूतीपर विचार करतील, अशी आशा आहे.
मुंबई महापालिकेत कोणत्याही प्रकारचे नगरसेवक नाहीत, हेच दुर्दैव आहे. सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजे होत्या. पण, हे मिंध्ये सरकार दर सहा महिन्याला निवडणुका पुढं ढकलत असल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. लोकप्रतिनिधीविरहित महाराष्ट्र प्रथमच या महाराष्ट्रात निर्माण झाला.
प्रशासकाच्या माध्यमातून काम केलं जातंय. लोकप्रतिनिधींची कणव असेल, तर ताबळतोब निवडणुका जाहीर करा, अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली. आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत. पक्षांची कार्यालयं उघडण्याच्या बाबतीत आयुक्तांना समजावून सांगितलं आहे. त्यामुळं ते सहानुभूतीपूर्ण विचार करतील.
मराठी भाषेत एक म्हण आहे. बाडगा अधिक कोडका असतो. हे कोडगेपणाची औलाद काहींच्या मनात घुसलेली आहे. हे कोडगे असे कोडगेपणा करणार. पण, यांना यांची जागा दाखवून दिली गेली पाहिजे, असंही विनायक राऊत म्हणाले.