नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील विविध भागात कोयता घेऊन गुंडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलीस एकीकडे कारवाई करत असतांना दुसरीकडे गुंडांचा धुमाकूळ सुरू आहे. अशी परिस्थिती असतांना कोयता बाळगणारे चौघा संशयितांना नाशिक शहर पोलीसांनी पंचवटीतील एका गुन्ह्यात अटक केली आहे. यामध्ये पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांनी महिलेवर हल्ला करण्यासाठी थेट घरावर पेट्रोल टाकून जाळपोळ केली आहे. नाशिकच्या सम्राटनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली असून अठरा ते वीस गुन्हेगारांनी हा धिंगाणा घातला आहे. काही घरांवर कोयत्याने हल्ला केला आहे. काही घरांच्या खिडकीच्या काचाही फोडल्या आहे. मध्यरात्रीच्या वेळी हा धुडगूस गुंडांनी घातल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. आरडाओरड करत महिलांना शिवीगाळ आणि घरांवर हल्ला केल्यानं नाशिक पोलिसांसमोर पुणे पोलिसांसारखं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
नाशिकच्या पंचवटी भागातील सम्रानगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने पंचवटी पोलीसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे, चौघांना पोलीसांनी अटक केली आहे.
मध्यरात्रीच्या वेळी हा धुडगूस घालून गुंडांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील कोयता गॅंगनंतर नाशिकमध्येही कोयता गॅंग सक्रिय होऊ पाहते आहे का? अशी चर्चा सुरू परिसरात होऊ लागली आहे.
महिलांना शिवीगाळ करत घरावर पेट्रोल टाकून जाळपोळही केल्यानं महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भयभीत झालेल्या महिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फोन करून ही माहिती दिली होती.
प्रशांत राजेंद्र निकम, बबलू हेमंत शर्मा, दीपक किसन चोथवे, सुनील निवृत्ती पगारे या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयते जप्त केले असून इतर साथीदार फरार झाले आहे.
रात्रीच्या वेळी नागरिकांनी पोलिसांना कळवून मध्यरात्री पोलिसांना जाळपोळ आणि तोडफोडीची घटना समजली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात होता.