औरंगाबादः ठाकरे सरकारने जाता जाता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) केलं. हा निर्णय काही संभाजी महाराजांवरील प्रेमामुळे घेतला नाही तर आपली खुर्ची, आपली सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी हे केलंय. भाजप आणि शिवसेनेने कधीही संभाजी महाराजांवरील प्रेमामुळे नामांतराचे प्रयत्न केले नाही. तर केवळ सत्ता मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी, श्रेयासाठी संभाजी महाराजांचा फुटबॉल केलाय, असा गंभीर आरोप खा. इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केला. संभाजीनगर नामांतराचे श्रेय काही दिवसांनी भाजप किंवा एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जाऊ नये म्हणून घाईने उद्धव ठाकरेंनी याविषयीचा प्रस्ताव मंजूर केला. आता फडणवीस म्हणतात, तो निर्णय़ अवैध, आम्ही त्याला कायदेशीर स्वरुप देऊ. हा सरळ सरळ श्रेयवाद असून संभाजी महाराजांबद्दल कुणालाही फार आदर नाही. फक्त सत्तेच्या खेळापोटी त्यांचा फुटबॉल केला जातोय, असा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केलाय. हा निर्णय घेताना औरंगाबादकरांच्या भावना लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही या विरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई करू, असा इशारा खा. जलील यांनी दिला.
औरंगाबादच्या नामांतराविरोधात सर्व पक्षांनी एकजूट केली असून आता यासाठी रस्त्यावर आणि कायदेशीर लढा देणार असल्याची माहिती खा. जलील यांनी दिली. ते म्हणाले, ‘ औरंगाबादकरांची ही भूमिका आहे. लोकांमध्ये चीड आहे. शहरवासियांशी चर्चा न करता हा निर्णय़ घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएम, आरपीआय या सर्व राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले. मुंबईत बसलेला आमच्या शहराचं नाव बदलू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांवरील प्रेमामुळे हे नाव आहे. आपली खुर्ची जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचं फडणवीस म्हणतायत. म्हणजे यांनाही श्रेय घ्यायचं आहे…’
फक्त बाळासाहेब ठाकरेंची इच्छा म्हणून हा निर्णय घेणं चुकीचं आहे, असा आरोप करताना खा. जलील म्हणाले, ‘ आम्हालाही आजोबा-पणजोबा आहेत. त्यांचीही इच्छा औरंगाबाद हे नाव ठेवण्याची होती. छत्रपती संभाजी महाराजांचा आम्हाला अनादर करायचा नाही. आम्ही नियमाप्रमाणे लोकशाहीत जे अधिकार दिले आहेत, त्यानुसार आम्ही विरोध करणार आहोत. हे शहर फक्त एका राजकीय पक्षाचं नाही. सत्ता तुमची होती. ती गेली. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एवढ्या वर्षांपासूनच्या या प्रश्नावर मौन कसं धरलं? एवढी काय लाचारी होती? अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात हे का गप्प बसले?’
खा. जलील म्हणाले, ‘ औरंगजेबामुळे हे नाव पडलं असं नाही. मग औरंगपुऱ्याचं नाव बदलणार का? या प्रकाराचा कुठे तरी अंत व्हायला पाहिजे. शहरात विकासकामं खूप करण्यासारखी आहे. अनेक लोक मला शिव्या देतायत. तुम्ही संभाजीमहाराजांवरून बोलतायत म्हणून. पण मी महापुरुषांचं नाव राजकीय स्वार्थासाठी कधीही वापरणार नाही…
संभाजी महाराजांवरील प्रेमामुळे शिवसेनेने हा निर्णय घेतला असेल तर २०१४ सालीच का घेतला नाही, असा सवाल खा. इम्तियाज जलील यांनी केलाय. या विषयावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या अंबादास दानवेंना उत्तर देताना खा. जलील म्हणाले, ‘ मी आयुष्यभर खासदार राहणार नाही. तसे तेही आमदार राहणार नाहीत. त्यांच्या आणि माझ्यात एक फरक आहे. मी खरं बोलतो. 2014 ला तुम्ही आणि बहुमतात सत्तेत होते. तेव्हा पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये हा निर्णय का नाही घेतला… आपली खुर्ची धोक्यात आली तेव्हा हा निर्णय का घेतला… छत्रपती संभाजी महाराजांवरील आदरामुळे हे केलं का… हे श्रेय मी नाही घेतलं तर उद्या भाजप घेईल, या भीतीने हे केलंय. तसंच झालंय.. आता फडणवीसही तेच म्हणतायत. त्यांनी घेतलेले निर्णय अवैध. आम्ही ते कायदेशीर रित्या मान्य करू. म्हणजे यांनाही श्रेयच घ्यायचं आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला.