औरंगाबादः मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी लाखोंची गर्दी होणार असे दावे केले जात आहेत. मात्र ही गर्दी पैसे देऊन आणली जाणार, असा आरोप चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. किंबहुना त्यांनी पत्रकारांनाच आवाहन केलंय की तुम्ही मला विचारण्यापेक्षा स्वतः तिथे जमलेल्या लोकांना विचारा. कुठून आले, किती पैसे मिळाले? लोक स्वतः तुम्हाला याची माहिती देतील. त्यामुळे अशा प्रकारे जमलेल्या लाख काय पाच लाख लोकांनी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड आहे आणि तो कायम राहणार, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये आज सभा घेणार असून या सभेनंतर औरंगाबादमधील राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेसाठी तर ही मोठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज पुन्हा मनसेच्या गर्दीवर भाष्य केलं.ते म्हणाले,’मनसेच्या सभेला लाख काय पाच लाख लोकं आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या जुन्या मित्रांच्या (भाजपा)च्या पाठिंब्याने ही गर्दी जमवली जात आहे. या गर्दीला कुणाची स्पाँसरशिप आहे, हे तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढा. तेथील लोकांना विचारा, असं आवाहान चंद्रकांत खैरे यांनी केलं.
मनसेच्या सभेत येणारे लोक पैसे घेऊन येणार आहेत, ही माहिती देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘ मला स्वतः वैजापूरहून आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातून फोन आले. पाच हजार रुपये घ्या, चहा-नाश्ता करा आणि सभेसाठी हजर रहा.. अशी ऑफर त्यांना मिळाली. त्यामुळे ही गर्दी कोणत्या स्वरुपाची आहे, तुम्हीच ठरवा, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी औरंगाबादध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर या सभेबद्दलच्या चर्चा चांगल्याच गाजत आहे. तसेच येत्या 03 मेपर्यंत राज्यातील मशिदींवरचे भोंगे हटवण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिल्यामुळे आजची औरंगाबादची सभा जास्त महत्त्वाची मानली जात आहे. या सभेत मनसे आपल्या इशाऱ्याविषयी अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकते. तसेच येत्या 03 मे रोजी रमजान ईददेखील आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे, हिंदुत्वाविषयी आक्रमक भूमिकेचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांतील राजकीय गणितंही राज ठाकरे यांच्या आजच्या सभेवर अवलंबून असतील. त्यामुळे अनेक शिवसेनेसह अनेक पक्षांसाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आज संध्याकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी राज ठाकरे यांची सभा सुरु होणे अपेक्षित आहे.