संभाजीनगरात अभूतपूर्व गोंधळ, मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, आंदोलकांची धरपकड, काय घडतंय?

| Updated on: Mar 16, 2023 | 1:41 PM

संभाजीनगरात मनसेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आज मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही शहरातून हा भव्य मोर्चा काढण्यात आला.

संभाजीनगरात अभूतपूर्व गोंधळ, मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, आंदोलकांची धरपकड, काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | संभाजीनगरच्या (Sambhajinagar) नामांतरावरून (Name change) आज शहरात मोठा गोंधळ माजला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या नामांतरविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने शहरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. तरीही मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर मनसे ठाम होती. शहरातील संस्थान गणपती भागातून मनसेचा विराट मोर्चा निघाला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने मनसैनिकांची ही रॅली निघाली असतानाच पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. संभाजीनगर पोलिसांनी शहागंज परिसरातच हा मोर्चा रोखला. यामुळे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले. पोलिस आणि मनसैनिकांमध्ये वाद, बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं.

‘औरंगजेब-औरंगजेब म्हणणाऱ्याला ताब्यात घ्या’

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकारातून आंदोलन सुरु आहे. खा. जलील यांच्या विरोधात मनसेने आज छत्रपती संभाजीनगरात विराट मोर्चा काढला. आज सकाळपासूनच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने या मोर्चासाठी जमू लागले. मात्र शहागंज परिसरातच पोलिसांनी हा मोर्चा रोखला. विभागीय आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा जाऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. वाद घालणाऱ्या काही मनसैनिकांना ताब्यातही घेतलं. त्यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. हिंदुत्ववादी सरकार असून आम्हाला ताब्यात घेताय? जो औरंगजेब औरंगजेब करतोय, त्याला आधी ताब्यात घ्या, त्याला अटक करा, अशी आक्रमक भूमिका मनसैनिकांनी मांडली.

प्रकाश महाजन भडकले

मनसेने सदर मोर्चासाठी ७ ते ८ दिवसांपूर्वीच परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारली. शहरवासियांचे नामांतराचे स्वप्न साकार झाल्याने मनसेनेने या मोर्चाला स्वप्नपूर्ती असे नाव दिले आहे. मात्र शहागंज परिसरात मनसेचा हा विराट मोर्चा रोखण्यात आला. त्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन चांगलेच भडकले. आम्ही राज्य शासनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढत आहोत. तरीही मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. आम्ही आनंददेखील साजरा करू शकत नाहीत का? इथले सीपी दुजाभाव करतात. राज ठाकरेंच्या सभेलाही परवानगी देताना खूप त्रास दिला होता. एमआयएमच्या कँडलमार्चला परवानगी दिली होती, पण आमची परवानगी का नाकारली, असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.