छत्रपती संभाजीनगर : आपलं राम मंदिर (Ram Temple) सुरक्षित आहे. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, कुणी अफवा पसरवत असेल तर आधी पोलिसांना(Police) कळवा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) करण्यात येतंय. छत्रपती संभाजीनगरात काल रात्री घडलेल्या राड्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आज रामनवमी निमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण आहे. काल रात्रीच्या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिराबाहेर दोन गटात झालेल्या वादावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. या घटनेनंतर किराडपुरा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संभाजीनगरातील किराडपुरा येथे काल दोन वाजता दोन गटात वाद झाला. मंदिराच्या बाहेर गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांकडून शाब्दिक चकमक उडाली. हा वाद अधिकच पेटत गेल्यानंतर घोषणाबाजी आणि दगडफेकही करण्यात आली. याचं पर्यवसन दंगलीत झालं. दोन्ही गटांकडून दगडफेक झाली, यात अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात पोलिसांची १० ते १२ वाहनं पेटवून देण्यात आली. अखेर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवलं. वाहनं जाळल्यानंतर या भागात राख, कोळसा जमा झालं होतं. या परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता किराडपुऱ्यातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा केला जाईल आणि त्यानंतर आरती केली जाईल. तसेच दुपारी ४ वाजता संस्थान गणपती येथे रॅली काढली जाईल, अशी माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.
आपलं मंदिर व्यवस्थित आहे,कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,कुणी अफवा पसरवत असेल तर पोलिसांना लगेच कळवा….
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) March 29, 2023
सदर प्रकारानंतर आज राम नवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची १० पथकं सदर ठिकाणी गस्तीवर आहेत. तसेच घटनेच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. किराडपुऱ्यातील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आलंय.
या घडलेल्या प्रकारानंतर किराडपुऱ्यातील राम मंदिर सुरक्षित आहे. मंदिराला कोणतीही हानी झालेली नाही, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
दरम्यान, किराडपुऱ्यातील ज्या राम मंदिर परिसरात हा राडा झाला, त्याच राम मंदिरात जाऊन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. तर भाजपचे आमदार अतुल सावे यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे.