मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी औरंगाबाद तापलं, वेदांता प्रकल्पावरून शिवसैनिक आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी शहरात येणार असून चार वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होईल.
औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आज औरंगाबाद दौरा आहे. या पार्श्वभूमीवर वेदांता प्रकल्प (Vedanta Project) प्रकरणावरून शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेल्यामुळे शिंदे सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलंय. औरंगाबाद शिवसेनेतर्फे (Aurangabad Shivsena) याच कारणावरून आज आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शहरातील टीव्ही सेंटर चौकात तीव्र निदर्शने केली जात आहे. या निदर्शनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी शहरात येणार असून चार वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होईल.