औरंगाबादः औरंगाबाद येथे उभारण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालयाला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे, ही चांगली बाब आहे. खा. जलील यांच्या प्रस्तावाचं मी स्वागत करते, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. या निमित्त गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाला आज विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते हजेरी लावतील. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती आहे. पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील भाषणाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
औरंगाबादमधील शासकीय दूध डेअरीच्या जागेवर महिला आणि लहान बालकांच्या उपचारासाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज 400 खाटांच्या रुग्णालयास लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात महापुरुषांचे स्मारक शासकीय निधीतून उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारण्याचे निर्देश संबंधितांना द्यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या सरकारी जागेवर राज्य सरकारकडून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. मात्र, सात वर्षांपूर्वी एमआयएमने विरोध दर्शवला होता. गोपीनाथ मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावे 200 खाटांचे अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय उभारावे, ही मागणी लावून धरली होती.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादमधील स्मारकाला इम्तियाज जलील यांनीच विरोध केला होता. खा. जलील यांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की , महान लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मारक उभारुन काहीही साध्य होणार नसल्याने औरंगाबाद शासकीय दूथ डेअरी येथे उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या स्मारकाला मी प्रखरतेने व आक्रमकतेने विरोध केला होता. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना खरी श्रध्दांजली म्हणजे रुग्णालय हेच असणार ! म्हणून मी शासनाने घोषित केलेल्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याएवेजी सुसज्ज रुग्णालय उभारावे. त्याकरिता मी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शासनाच्या विविध स्तरावर यशस्वी पाठपुरावा करुन सर्व सोयीसुविधासह रुग्णालय बांधण्यासाठी मी मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिका क्रमांक ९९/२०१७ च्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्मारकाच्या जागेवर सुसज्ज महिला व शिशु रुग्णालय उभारण्याचे आदेश दिल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले.
आज स्मारकाऐवजी त्याच ठिकाणी सद्यस्थितीत 400 खाटाच्या भव्य रुग्णालयाचे बांधकाम युध्दस्तरावर सुरु आहे. सबब बांधकामाचा मी वेळोवेळी आढावा घेवून विहीत वेळेत गुणवत्तापूर्ण, दर्जात्मक व दोषमुक्त बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागास करीत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.