औरंगाबाद : केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत सैन्य भरती लवकरच सुरु होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्नीवीरांचीही भरती केली जाणार आहे. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत शहरात पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीत औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोल, जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुणांना सहभागी होता येईल. देशाच्या सैन्यदलात (Indian Army) सहभागी होण्याची ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त तरुणांनी या भरती परीक्षेसाठी आपली हजेरी लावावी आणि यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी केले आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या भरतीच्या अनुषंगाने नुकतीट आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या भरतीच्या अनुषंगाने 1 जुलै रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कर्नल प्रवीण कुमार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजन फिरासत उपस्थित होते. यात औरंगाबाद येथील भरतीसाठी कोण-कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होईल, भरतीची प्रक्रिया काय असेल आणि कालावधी काय ठरवता येईल, यावर चर्चा झाली. तसेच शहरात होणारी सैन्यभरती करिता प्रशासकीय यंत्रणा कशी मदत करू शकते, यावरही चर्चा झाली.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले की, अर्ज करण्याची प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपाची आहे. तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रीया पूर्ण करावी. प्राप्त अर्जाची छानणी इंडियन आर्मीव्दारे होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर भरती संदर्भातील शारिरीक चाचणी तसेच संबंधित प्रक्रीया पार पडणार आहे. ही भरती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा तरुणांनी ww.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी केंद्र सरकारतर्फे अग्नीपथ या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 4 वर्षांसाठी तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. या तरुणांना 6 महिने सैन्यात भरती होण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर पुढील चार वर्षे त्यांना 30 हजार रुपये पगारानुसार, सैन्यात भरती करून घेतले जाईल. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या तरुणांना वेतन मिळणार नाही. तसेच या नोकरीदरम्यान, त्यांना दुसरा अभ्यासक्रमही शिकता येईल. प्रशिक्षणानंतर सैनिकांना अग्नीवीर म्हटले जाईल. 4 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर 75 टक्के जवान निवृत्त होती. त्या बदल्यात त्यांना 10 ते 12 लाख रुपयांची रक्कम दिली जाईळ. तर 25 टक्के जवानांना दीर्घ कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाईल.