औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्यावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदावर असताना शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राज्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या प्रस्तावाच्या परवानगीस विरोध केला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. औरंगाबादकरांना विचारात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला. सत्तेतील काँग्रेसचे नेतेही हे घडताना मौनात का गेले होते, असा सवाल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे. स्थानिक काँग्रेसचे नेते औरंगाबादच्या नामांतराचा हा मुद्दा आता दिल्लीत नेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची लवकरच ते भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शहरातील बहुतांश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर वरिष्ठ मंत्र्यांसमोरही आपली नाराजी दर्शवली. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते राज्यातील काँग्रेस नेत्यांचं गाऱ्हाणं घेऊन दिल्लीत जाणार असल्याची माहिती हाती आली आहे
औरंगाबादचे स्थानिक नेते बकरी ईद झाल्यानंतर दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जुलै या दिवशी बकरी ईद आहे. त्यानंतर शहरातील काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेणार आहेत. शहरातील काँग्रेस पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘ औरंगजेबानं स्वतःच्या वडलांचाही खून केल्याची इतिहासात नोंद आहे. हा विषय कुठल्या समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दलच्या भावनांवरून सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही हीच इच्छा होती. म्हणून आम्ही काहीही विरोध केला नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना केलं.