औरंगाबादः आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील राजकीय वातावरण तापू लागलंय. गेल्या महिन्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा झाली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही येथील नागरिकांच्या पाणी समस्येविरोधात मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. आता येत्या 08 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thcackeray) यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ही सभा घेतली, तिथेच उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शिवसेनेतर्फे या सभेला ‘स्वाभिमानी सभा’ असे नाव देण्यात आले आहे. अशा आशयाचे ईमेल औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. शुक्रवारी हे ईमेल पदाधिकाऱ्यांना मिळाले.
08 जून रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. 05 जून रोजी शिवसेनेचे प्रमुख नेते अधिकृतपणे याविषयीची माहिती देतील. जिल्ह्यातील 2700 बूथवरून प्रत्येकी 25 नागरिक येतील, असा अंदाज अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. सभेतील साऊंड सिस्टिमचे काम मुंबईच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. तसेच या सभेसाठी 30 हजार खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. 5 जूनपर्यंत जिल्ह्यात दीड हजार बैठका घेण्याचं नियोजन शिवसेनेनं केलं आहे. सभेला दीड लाखांवर गर्दी जमेल, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने केली जात आहे. यासाठी 03 हजार वाहने शहरात येतील.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच शिवसेनेच्या वतीने 5 टीझर तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात उद्धव ठाकरेंच्या ‘मी सांगतोय ना संभागीजनगर झाले..’. हे मुंबईतल्या सभेतलं वाक्यही वापरण्यात आलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा गाजणार हे निश्चित आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या जाहीर सभेला औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, खासदार संजय राऊत हे उपस्थित राहण्याची शकयता आहे. तसेच आदित्य ठाकरे हे सभेला येतील की नाही, हे अद्याप निश्चित ठरलेलं नाही.