मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा वाढता पाठिंबा एक-एक करून औरंगाबादमधील (Aurangabad) महत्त्वाचे मतदारसंघ पोखरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी काल मुंबईत शेकडो शिवसैनिकांसह शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची स्थिती आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांनी मुंबईत भरवलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. शिवसेनेच्या इतिहासात मध्यरात्री झालेली ही पहिलीच सभा असल्याचा गावा करण्यात येत आहे. एकूणच संजय शिरसाट यांच्यामार्फत औरंगाबादमधील शिवसेनेतील असंख्य पदाधिकारी फुटल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी युवा सेनेचा निष्ठा मेळावा आयोजित केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार शिदे गटात शामील झाले आहेत. त्यात आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याने त्यात वर्णी लागावी, यासाठी शिरसाट यांनी मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे पश्चिम मतदार संघातील बहुसंख्य पदाधिकारी मुंबईला गेले. यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सोनवणे, माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख रमेश बहुले, राजू राजपूत, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आदीसह ग्रामीण भागातीलही शेकडो कार्यकर्ते होते.
औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जात होता. मात्र शिंदे गट फुटल्याने येथील शिवसेना खिळखिळी झाली आहे. पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्तेही बंडखोर आमदारांना शामिल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निष्ठा मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. युवा सेनेच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता टीव्ही सेंटर येथे निष्ठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी आदींची उपस्थिती असेल. सौभाग्य मंगल कार्यालयातील मेळाव्याला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा सेनेचे उपसचिव ऋषीकेळ खैरे आणि जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला आहे. हे सात-आठ वर्षांपासून मंत्रिपदासाठी हपापलेले आहेत. जे स्वतःच्या मतदार संघात कधीही येत नाहीत. फिरत नाहीत. इकडे एक गाडीही त्यांनी कधी आणली नाही. पण मुंबईत मात्र त्यांनी एवढ्या बसेस नेऊन शक्तिप्रदर्शन केलं. त्यातीलही बहुतांश लोक शिवसैनिक नव्हते. हे सगळं मंत्रिपदासाठी सुरु असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.