संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात प्रचंड हाणामारी झाली. दोन गटात धक्का लागल्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर बघता बघता दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत पोलिसांची वाहने जाळली. त्यामुळे औरंगाबादमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा पथके स्थापन केली असून या समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे.
काल रात्री संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथे हा राडा झाला. मंदिराच्या बाहेर दोन गटात गाडीला धक्का लागल्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देत एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुण काही लोकांना घेऊन आले. त्यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली आणि त्यांचं पर्यावसान दंगलीत झालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफे करण्यात आली. काही लोकांनी खासगी वाहने पेटवून दिली. त्यामुळे एकच तणाव पसरला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं. पण जमाव प्रचंड होता. पोलिसांचं ऐकत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला. पण पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. पोलिसांची 10 ते 12 वाहने पेटवून देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून जमावाला पांगवलं. पोलिसांनी या ठिकाणी जळालेली वाहने उचलून नेली आहेत. तसेच या परिसरातील वाहने जळाल्याने निर्माण झालेला कोळसा आणि कचरा स्वच्छ केला आहे. तसेच रस्तेही धुवून काढले आहेत. किराडपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची पथक किराडपुरात गस्त घालत आहेत. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, या राड्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी राडा करणाऱ्या तरुणांना अटक करण्यासाठी 10 पथके तयार केली आहेत. गल्लीबोळात जाऊन या दंगलखोरांना अटक केली जाणार आहे. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाची चौकशीकडून त्याच्याकडून इतर समाजकंटकांची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहेत. तर, स्थानिक लोकप्रतिनिधींना लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मंदिराला कोणतही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन या लोकप्रतिनिधींनी केलं आहे.