औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड उसळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले. आमदारांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून आधी गुजरात आणि पुन्हा गुवाहाटीला नेण्यात आले असे आरोप संजय राऊत यांनी केले. त्यानंतर एका एका आमदारला 50 कोटींची (50 Coror) ऑफर दिल्याचाही आरोप झाला. एका शिवसेना आमदाराने तर आपल्यालाही 50 कोटींची ऑफर असल्याचा गोप्यस्फोट केला. त्यानंतर सगळीकडे पन्नास कोटींच्या आकड्याचा बोलबाला सुरू झाला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही दिल्लीत याबाबत प्रश्न विचारण्यात आलं. मात्र कसले पन्नास खोके मिठाईचे का? म्हणत एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाची खिल्ले उडवली. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत यांनी आईची शपथ घेऊन सांगावं खासदार होण्यासाठी किती कोटी दिले असं थेट विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
पन्नास कोटींच्या चर्चेबाबत विचारले असता अब्दुल सत्तार म्हणाले, संजय राऊत यांनी आई बापाची शपथ घेऊन सांगावं खासदार होण्यासाठी किती कोटी दिले. तसेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय अंतिम राहील. मला काहीच नको, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवेत, मला सगळ्यात महत्त्वाचं पद आहे, ते म्हणजे कार्यकर्त्याचं पद आहे. या चार दिवसात निधी मिळाला तो आयुष्यात एवढा निधी पाहिला नाही. असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तसेच सर्वसामान्यांना आपला माणूस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राहतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड गेल्यानंतर सुरुवातीला पस्तीस आमदार ठाकरेंच्या संपर्कात नसून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले, असल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर काही नेते मातोश्री वरील बैठकांमध्ये ही दिसून आले. मात्र काही दिवसातच तेही एकनाथ शिंदे यांच्या जवळ गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर प्रत्येक आमदारला 50 कोटींचा आकडा ऑफर केल्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली. मात्र सर्व आमदारांनी यावरून सडकून टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच हे बंड झालं आहे. शिवसेना आज ज्या अवस्थेत आहे, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत, असं प्रत्येक आमदार आता म्हणताना दिसत आहे. आता शिवसेना आमदारांचा दावा खरा की संजय राऊतांचं विधन खरं हे कुणाला माहिती नाही, मात्र सध्या तरी यावरून मोठा वाद पेटला आहे.