औरंगाबादः भाजप आणि शिवसेना युतीचा पूल बांधण्यासंदर्भात वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आणलेल्या अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य केलं आहे. महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिल्लोड येथे बोलताना दिली.
शिवसेना आणि भाजपमधील युतीसाठीचे प्रयत्न नितीन गडकरीच करू शकतील, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. हे सांगताना त्यांनी स्पष्टीकरणही दिले. नितीन गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केलं. मी कालही तेच विधान केलं आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केलं.
यापूर्वीदेखील अब्दुल सत्तार यांनी युतीसंदर्भात हेच वक्तव्य दिल्लीत केलं होतं. तसेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अब्दुल सत्तारांची चांगलीच कानउघडणी केली होती. अब्दुल सत्तारांना शिवसेनेत येऊन किती दिवस झाले? अब्दुल सत्तार यांची अजून हळद आणखी उतरायची आहे, अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी त्यांची कानउघडणी केली होती. आता पुन्हा एकदा सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सिल्लोडमध्ये आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. गल्लोगल्ली, दारोदारी भगवे झेंडे फडकवण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिल्लोड नगरपरिषदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
इतर बातम्या-