लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत महायुतीचे, त्यातही खासकरून भाजपचे दिग्गज नेते पराभूत झाले. रावसाहेब दानवे यांनाही यावेळी घरी बसावं लागलं. दानवे यांचा पराभव शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपांना अब्दुल सत्तार यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांना मी पाडलं म्हणता. अयोध्येत भाजप पडली. तिथेही मीच पाडलं का?, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. रावसाहेब दानवे यांना योग्य वेळात उत्तर दिलं जाईल. त्यांना 25 वर्ष मतदारांनी इथून लीड दिली आहे. माझ्यावर बेछूट आरोप करताना विचार केला पाहिजे. अयोध्येत भाजप पडली तिथे मी पाडलं का? दानवे यांच्या मतदासंघात सर्वाधिक सभा मी घेतल्या आहेत. आरोप करून समाधान वाटत असे तर त्यांनी खुशाल आरोप करावेत. मी एवढा मोठा नाही की खासदार पडेल. मात्र लोक समजतात. आपला पराभव का झाला? याचा विचार रावसाहेब दानवे यांनी करावा, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला.
रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तर टोपी काढेल असं मी 2014मध्ये म्हटलो होतो. त्यानंतर मी त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं. आता त्यांना टोपी काढण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार आहे, असं सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना पाडल्याने त्यांना मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी भाजपमधून होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. झिरो बजेट लोकांची चर्चा तुम्ही करावी का? खडकू लोक आहेतही. मी त्यांची चर्चा करणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
आमच्या मतदारसंघातील गावं आणि तांड्यावर मी सतत फिरत असतो. तुम्ही मतदारसंघात कुणालाही विचारू शकता. मी काही रेडिमेड पुढारी नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेला पुढारी नाही. मी कुत्रा निशाणीवरही निवडून येऊ शकतो, असंही ते म्हणाले.