आता वाजले की बारा… दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार?

| Updated on: Jul 24, 2024 | 11:16 AM

पूजा खेडकर प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. रोज नवे गौप्यस्फोट होत असल्याने पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. काल पूजा यांना मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी हजर राहायचे होते. पण त्या पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे त्या गेल्या कुठे? असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन यूपीएससी परीक्षा पास होणाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

आता वाजले की बारा... दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार?
Puja Khedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची चर्चा असतानाच आता मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणार आहेत. पूजा खेडकर प्रकरण गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असल्याने या हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. गेल्या 20 हँडीकॅप झाल्याच्या आधारे आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची लिस्ट बनवण्याचं काम सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या 20 वर्षातील दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उच्चस्तरावर होत असलेल्या या झाडाझडतीमुळे यूपीएससीतील गैरकारभाराला आळा बसणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

त्यांचेही धाबे दणाणले

दरम्यान, पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होणार आहे. वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह या प्रकरणात पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वायसीएममधील अनेकांचे धाबे दणाणले आहे. खोटे सर्टिफिकेट फक्त पूजा खेडकर यांनाच दिलंय का? की या मागे आणखी कोणतं रॅकेट आहे? याचीही चौकशी यावेळी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पूजा खेडकर नॉट रिचेबल

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने पूजा यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासूनच पूजा या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांचा फोनही लागत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर गेल्या कुठे? असा सवाल केला जात आहे.

पूजा यांना उत्तराखंडच्या मसुरीत प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांना मंगळवारपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण त्या काल मसुरीत आल्याच नाहीत. त्याआधीच त्या गायब झाल्या आहेत. चौकशीसाठी हजर न राहण्याचं कारणही त्यांनी कळवलं नसल्याचं सांगितलं जात आहे.