हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच संपूर्ण यंत्रणेचा वापर करून खासदार निवडून आणले असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. भाजपच्या संघटना बांधणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, 200 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तसेच लोकसभेच्या 45 जागा शिंदे व भाजपा यांच्या समन्वयातून आम्ही जिंकणार आहोत.
माजी मंत्री अनिल देशमुख यांना कोर्टानं जामीन मंजूर केला. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, कोर्टाला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा निर्णय करतं. अनिल देशमुखांच्या बाबतीत काही पुरावे होते. म्हणून त्यांना अटक झाली होती. आता कोर्टाने त्यांना जामीन दिलाय. पण, केस संपलेली नाही. फक्त जामीन मिळालाय.
हिंगोली लोकसभेत शिंदे गटाचा खासदार असताना भाजप तयारी करत आहे. येत्या लोकसभेला भाजप उमेदवार देणार का, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, शिंदे गटाला सोबत घेऊनच आम्ही लोकसभा लढविणार आहोत. त्यांच्याकडे जागा आहे तर त्यांच्यासाठी भाजप ताकत लावणार आहे.
निर्भया फंडाचा निधी शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात आलाय. यावर बावनकुळे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी सरकार सक्षम आहे. सरकारकडून याची चौकशी केली जाईल.
महाविकास आघाडीचा मोर्चा येत्या 17 तारखेला निघणार आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विरोधी पक्षाचे कामच आहे, त्यांनी मोर्चा काढावा. त्यांच्या मोर्चात काही महत्वाचे मुद्दे असतील तर सरकार त्यावर निर्णय घेईल.