औरंगाबादः औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शहरातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी (Job Apportunity) उपलब्ध करून दिली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज JOB FAIR चे आयोजन केले असून त्यांच्या ऑफिसमध्ये यानिमित्त आज हजारो तरुणांची गर्दी पहायला मिळाली. शहरातील सुशिक्षित तरुणांनी (Educated youth) या मेळाव्यात उपस्थित राहून आपली पात्रता सिद्ध करावी आणि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मुलाखती द्याव्यात, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. त्यानुसार अनेक तरुणांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.
खासदार इम्तियाज जलील साहेबांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सुरू केलेल्या JOB ALERTS अंतर्गत औरंगाबाद शहरातील नामांकित कंपनी मध्ये युवकांना नौकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खासदार कार्यालय येथे कंपनी मार्फत मुलाखत घेवून थेट नोकरी देण्यात येत आहे. फक्त 8 तास काम करून कमीत कमी 11200/- ते 11800/- पर्यंत व जास्तीत जास्त 15000/- पर्यंत पगार असेल. अतिरिक्त काम केल्यास त्याची अधिकची पगार देण्यात येईल. विशेष म्हणजे येण्या-जाण्या साठी कंपनीची बस राहणार आहे, अशी ऑफर या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली होती.
आज दिल्ली गेट रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या खासदार कार्यालयात या जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं. दहावी, बारावी, आयटीआय आणि डिप्लोमा तसेच कोणत्याही पदवीधरांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी वयाची अट 18 ते 32 अशी घालण्यात आली होती.