औरंगाबादः औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न (Aurangabad water problem) गंभीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी आज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली. या मिटिंग मध्ये औरंगाबाद भूजल पुनर्भरणसाठी दृष्टीने तीन वर्षांचा प्लान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहराच्या पाणीप्रश्नावर लवकरच उत्तर मिळेल, असे चित्र दिसून येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय (Astik kumar Pandey) शहराच्या पाणीप्रश्नाच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली. शहराची भूजल पातळी वाढवणे, शहराला टँकर मुक्त करणे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे भूगर्भशास्त्रज्ञ शहराचे सर्वेक्षण करणार आहेत. शहराचा भुगर्भाचा अभ्यास करणार आहेत. शहरात कुठे पाणी अडवता येईल, कुठे पाण्याची पातळी वाढवता येईल याचा अभ्यास केला जाईल. यानंतर शहरासाठी तीन वर्षांचा प्लॅन तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
शहरासाठी तीन वर्षांचा प्लॅन तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी पाणी साठा रिचार्ज करण्यात येईल. या प्लॅनमुळे बोअर, विहीर, नाले यांमधील पाणीसाठा जास्त दिवस टिकेल. मार्च महिन्यात संपणारे बोरचे पाणी एप्रिल-मे महिन्यात देखील पुरेल. ही विस्तृत प्रक्रिया आहे. त्यामुळे याला वेळ लागेल मात्र ही प्रक्रिया अशक्य नाही. या प्रक्रियेत शाफ्ट रिचार्ज करण्यात येतात. विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी ट्रेंचिंग केले जाते. पावसाचे पाणी कसे जिरवता येईल, खुल्या जागा आणि मैदाने यांवर वाहणारे पाणी जागीच थांबवून कसे जिरवता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील.
यापूर्वी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी 2016 मध्ये अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना GSDA सोबत काम केले आहे. अकोला जिल्ह्यात रिचार्ज शाफ्ट करून शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी काम केले होते. अकोला जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता औरंगाबाद येथे देखील या प्रकारचा प्रयोग राबविण्यात येत आहे. यासाठी आज गुरुवारी मीटिंग घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, GSDA चे प्रादेशिक उपसंचालक भीमराव मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज सुरडकर, सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ बर्डे, उप अभियंता कैलास आहेर, मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्मार्ट सिटी टीम यांची उपस्थिती होती.