औरंगाबादः दारू पिऊ नको, असं वारंवार सांगितल्यानंतरही पती दारू पिऊन आला. त्यामुळे चिडलेल्या पत्नीनं (Wife) त्याला घरात घेतलं नाही. त्यामुळे नशेतच हा कामगार माघारी फिरला आणि एका बसच्या खाली जाऊन झोपला. खासगी कंपनीची ही बस होती. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली अन् मोठा घात झाला. बसखाली झोपलेला कामगार चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादमधील (Aurangabad Accident) मुकुंदवाडी (Mukundwadi) परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी गाडी चालकाला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी किशोर मगरे असं या कामगाराचं नाव आहे. रवीला दारुचे प्रचंड व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे पत्नीने राज नगरातील माहेर गाठले होते. गुरुवारी रात्रीही तो दारू पिऊन पत्नी जिथे होते, त्या ठिकाणी गेला. मात्र पत्नीने त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे तो पुण्याला जात असल्याचे सांगून निघाला. तेथून तो वाहनाखाली येऊन झोपला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रवी हा घरातून निघाल्यावर मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला होता. ती गाडी पाटील ट्रान्सपोर्टची होती. सकाळी कंपनीतील शिफ्ट चेंज होत असल्यामुळे कामगारांना आणण्यासाठी चालक गणेश राठोड गाडी सुरु करून घेऊन गेला. त्याच वेळी गाडीखाली झोपलेला रवी हा मागच्या टायरखाली आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी येणाऱ्या-जाणाऱ्यांना मृतदेह दिसल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सदर गाडी चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा चाकाखाली कुणीतरी झोपलं असावं, असं लक्षात आल्याची कबुली दिली.
इतर बातम्या-