औरंगाबादः औरंगाबाद शहरातून (Aurangabad city) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अग्नीवीर (Adniveer) सैन्य भरती दरम्यान शहरात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या भरतीदरम्यान तरुणांची फिटनेस टेस्ट घेतली जाते. यावेळी रनिंग करताना एका तरुणाला चक्कर आली. धावपट्टीवरच तरूण खाली कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा कन्नड तालुक्यातून आला होता. मात्र सैन्यात भरती होण्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली. या प्रकारामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये काही वेळ घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.
औरंगाबादेत विद्यापीठ ग्राउंडवर सध्या अग्नीवीर सैन्य भरती सुरु आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाची भरतीदरम्यान रनिंग सुरु होती. 1600 मीटर रनिंग करताना या तरुणाला चक्कर आली. कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील हा तरुण होता. 20 वर्षीय या तरुणाचं नाव करण पवार असं होत. रनिंग करताना अचानक कोसळल्याने त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरु आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची गर्दी लोटली आहे. मात्र आलेल्या तरुणांना राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची सोय नाही. हे तरुण रस्त्यावर किंवा मिळेल तिथे आडोसा पाहून झोपत आहेत. अशा प्रकारे रात्र काढल्यानंतर तरुणांना भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच अग्नीवीरांच्या अशा गैरसोयीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. आज रनिंग करताना तरुणाचा असा एकाएकी मृत्यू झाल्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय ठरले, हे तपासले जावे, अशी मागणी केली जात आहे…