Aurangabad | शहरात Ride For Autism सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्हाधिकारी चव्हाणांचीही सायकलस्वारी

| Updated on: Apr 10, 2022 | 4:13 PM

ऑटिस्टिक मुलांच्या समस्या इतर मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अपंग मुलांच्या समस्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्या समजून घेऊन त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उपक्रमास शुभेच्छा देताना केले.

Aurangabad | शहरात Ride For Autism सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्हाधिकारी  चव्हाणांचीही सायकलस्वारी
औरंगाबादेत ऑटिझम दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद | शहरात ऑटिझम डे निमित्त आयोजित सायकल रॅलीला (Cycle Rally) औरंगाबादकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहा वर्षाच्या मुलांपासून ते साठवर्षांच्या प्रौढांपर्यंत सुमारे 300 जणांनी ‘राइड फॉर ऑटिझम’ मध्ये सहभागी होत ऑटिझम (Autism) बाबत जनजागृतीचा संदेश दिला.  औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऑटिस्टीक मुलांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी दहा किलोमीटर सायकलींग करत ऑटिझम जनजागृतीच्या या उपक्रमात भाग घेतला.

विभागीय क्रीडा संकुलापासून सुरुवात

गारखेड्यातील विभागीय क्रिडा संकुल येथून सकाळी 6.30 वाजता सायक्लोथॉनला सुरुवात झाली. सेव्हन हिल, क्रांती चौक ते विट्स हॉटेल  सायकल ट्रॅक मार्गे देवगिरी कॉलेज, दर्गा चौक ते पुन्हा विभागीय क्रिडा संकुल असा दहा किलोमीटरचा हा सायक्लोथॉनचा मार्ग होता. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले. ज्यांनी सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदवला नव्हता त्यांनी झुंबा सेशनचा आनंद घेतला. झुंबामध्ये सुमारे पन्नासच्यावर जण सहभागी झाले होते. नवजीवन मतिमंदमुलांची शाळा तसेच औरंगाबाद पॅरा ऑलंम्पिक संघटनेतर्फे सुमारे पंचवीस विशेष मुलांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. या मुलांना आरंभतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा सायकल संघटना आणि पीसीओडी क्लबने संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले.

औरंगाबादेत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

छोट्या दोस्तांची राईड

वय वर्षे आठ ते दहाच्या इशा आसेगावकर, अनय जैन आणि अर्णिका कचेश्वर या छोट्यांनी संपूर्ण दहा किलोमीटरचा मार्ग पूर्ण केला. तसेच यावेळी उपस्थित विशेषमुलांबरोबर दोस्ती आणि मस्ती केली. त्यांचा उत्साह दांडगा होता. तर आरंभचा स्वमग्न विद्यार्थी किरण जोशी याने ही राईड पूर्ण केली. अंध सायकलपटू आणि आर्यनमॅन म्हणून प्रसिध्द असलेले निकेत दलाल यांनी दहा किलोमीटरची राईड त्यांच्या वैशिष्टपूर्ण सायकलवर सर्वप्रथम पूर्ण केली. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही यावेळी हजर होता.

जिल्हाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग

2 एप्रिल जागतिक ऑटिझम डे च्या निमित्ताने दरवर्षी आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन जनजागृती सप्ताह साजरा करते. संपूर्ण आठवडा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आरंभ आणि पीसीओडी क्लबच्या वतीने ऑटिझम डे आणि हेमंत देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त ही सायकल रॅली घेण्यात आली.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सायकल रॅलीस झेंडा दाखवण्यात आला. यावेळी डॉ. मंगला बोरकर, डॉ. संगीता देशपांडे, जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी शिवराज केंद्रे, आरंभचे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर, औरंगाबाद ऑलंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, चेतन पाटील, वैशाली सुतावणे आणि मिलींद दामोदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी प्रास्ताविक केले. ऑटिस्टिक मुलांच्या समस्या इतर मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अपंग मुलांच्या समस्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्या समजून घेऊन त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उपक्रमास शुभेच्छा देताना केले.

इतर बातम्या-

Bhor Ram Navmi : पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा साजरा; पाहा Video

Sharad Pawar : आंदोलकांचा घरात घुसून पवारांना इजा करण्याचा डाव होता, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप