औरंगाबाद | भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्वच भाजप नेते, कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. औरंगाबादमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनीही सुसाट बाईक रॅली काढली. नाना या नावाने लोकप्रिय असलेले हरिभाऊ बागडेंच्या रॅलीचा हा व्हिडिओ सध्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होतोय. त्याचं कारणही विशेष आहे. 78 वर्षीय हरिभाऊ नानांनी नेहमीच्या धोतरधारी वेशात अफलातून बाईक सवारी केलीय. एवढंच नाही तर बाइक चालवताना धोतर सावरत त्यांनी भारतीय जनता पार्टीची (BJP) घोषणाबाजीही केलीय. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही थक्क झाले. औरंगाबादमधील इतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील या रॅलीत सहभागी होते.
Aurangabad | तरुणांनाही लाजवणारा उत्साह, 78 वर्षीय हरिभाऊ बागडे नानांची सुसाट बाईक रॅली, दणक्यात घोषणाबाजी pic.twitter.com/laUBvxcl7t
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2022
आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रा ते करमाड येथील हनुमान मंदिरापर्यंत बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बागडे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त औरंगाबाद तालुका भाजप व युवा मोर्चाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, माजी सभापती राधाकिसन पठाडे, सजनराव मते, सजन बागल, माजी सरपंच दत्तात्रय उकर्डे, साहेबराव दिघोळे, राधाकिसन भोसले, अप्पासाहेब शेळक आदी सहभागी होते.
हरिभाऊ बागडे यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त भर उन्हात ही बाईक रॅली काढली. तरुणांनाही थक्क करणारा हा उत्साह होता. बाईकला भाजपाचा झेंडा लावलेला आणि तोंडाने भारतीय जनता पार्टीच्या विजयाची घोषणाबाजी हे चित्र कालच्या बाईक रॅलीत पहायला मिळाले. 1985 साली पहिल्यांदा आमदारकी मिळालेले हरिभाऊ बागडे हे सलग चार वेळा आमदार झाले. मनोहर जोशी यांच्या मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातही ते होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून त्यांना विजय मिळवला. त्या विधानसभा निवडणुकीतच त्यांचे वय पाहता आता निवडणूक लढवू नये, अशी चर्चा सुरु होती. मात्र बागडे यांच्या उत्साहापुढे हा दबाव टिकला नाही. त्यांनी उमेदवारी खेचून आणली. निवडणूक लढवली आणि जिंकलेदेखील. त्यामुळे आता 2024 मधील निवडणुकीतही हा उत्साह कायम राहतो की काय, अशी चर्चा आहे.
इतर बातम्या-