औरंगाबादः औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून मारहाणाच्या (Aurangabad fighting) घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. कालच करंजखेडा बाजारसमितीत दोन व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्यालाच मारहाण (Pachod officer beaten) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मंडळ अधिकारी काम करत नसल्यामुळे ही मारहाण झाल्याचं कारण समोर आलं आहे. काल समोर आलेल्या घटनेत, करंजखेडा (Karanjkheda trader beaten) येथील घटनेत शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव दिला म्हणून संबंधित व्यापाऱ्यावर संताप काढण्यात आला होता तर आज पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेवरून अशा प्रकारे राग व्यक्त करण्यात आला आहे. मात्र लोकशाही मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी दाद मागण्याची कायद्यानुसार, सुविधा असताना हे प्रकरण मारहाणीपर्यंत, एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जातंय, हे समाजासाठी जास्त धोकादायक आहे. तसेच थेट कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत, याचाच दुसरा अर्थ म्हणजे नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवरही अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.
औरंगाबादमधील पाचोड गावातील मंडळ अधिकारी काम करत नसल्याचा आरोप करत श्रीमंत अहिरे याने आधी वादावादीला सुरुवात केली. त्यानंतर या वादाचं रुपांतर भांडणात आणि थेट मारहाणीत झालं. मंडळ अधिकारी कार्यालयातच जयकुमार केकान या अधिकाऱ्याला बेदम चोप देण्यात आला. मारहाणीच्या या आवाजाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले आणि त्यांनी या प्रकारात हस्तक्षेप केला. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पाचोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
औरंगाबादः आता पाचोडमध्ये मारहाण, मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की pic.twitter.com/s2Ygp2r9zy
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2022
कन्नड तालुक्यातील करंजखेडा उपबाजार समितीत मका आणि भुसार व्यापाऱ्यांना मारहाणीची घटना समोर आली होती. रविवारी हा प्रकार घडला होता. साहिल जयकुमार चुडीवाल यांचे करंजखेड येथे भुसार मालाचे दुकान आहे. मागील चार वर्षांपासून ते आणि त्यांचे भाऊ भुसार मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मक्याची खरेदी विक्री चालू असताना येथील हर्षवर्धन निकम यांनी नेवपूर येथील संजय सुरडकर या शेतकऱ्याचा मका खरेदी करून पावतीवर खाडाखोड केली होती. ही खाडाखोड का केली, असे म्हणत हर्षवर्धन निकम, दत्तू गवारे, संदीप निकम आणि नीलेश यांनी चुडीवाल बंधूंना दुकानात घुसून मारहाण केली. तसेच दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत साहिल चुडीवाल व त्यांचा भाऊ सुयोग जखमी झाले. पिशोर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल असून तीन दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.
इतर बातम्या-