औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला विभाग प्रमुखांनीच 25 हजार रुपयांची लाच (Bribe Case) मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. अंजली घनबहाद्दूर या विद्यार्थिनीने यासंदर्भात तक्रार केली आहे. शिक्षणशास्त्र विभागाच्या डॉ. उज्वला भडंगे या विभाग प्रमुखांनी आपल्याला 25 हजारांची लाच मागितल्याचा आरोप अंजली यांनी केला आहे. या दोघींच्या फोन कॉलची एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली आहे. यात शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला भगंडे (Dr. Ujjwala Bhadange) यांचा आवाज असल्याचा दावा अंजली यांनी केला आहे. विभागप्रमुखांनी आपल्याला लवकरात लवकर २५ हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली असल्याचे अंजली यांनी सांगितले. ही ऑडिओ क्लीप सध्या विद्यापीठ परिसर तसेच औरंगाबाद शहरात व्हायरल होत असून या प्रकरणी तत्काळ खुलासा करत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी अंजली यांनी केलेल्या दाव्यानुसार, ऑडिओ क्लीपमधील समोरील व्यक्ती डॉ. उज्वला भडंगे आहे. त्यांच्यातील संवाद खालील प्रमाणे-
अंजली- गुड आफ्टरनून मॅम. मला वहिनीने सांगितलं, तुमचा फोन आला होता.
डॉ. उज्वला- तुम्हाला डिटेल्स मिळाले आहेत. इथे या. आम्ही तुमची वाट पाहत आहोत.
अंजली- पण एकदम 25 जमा होणार नाहीत मॅम. ही फीस आहे का?
डॉ. उज्वला- नाही ही फीस नाही.
अंजली- दोघींचे मिळून 25 आहेत की वेगवेगळे?
डॉ. उज्वला- नाही. दोघींचे सेपरेट. सेपरेट.
अंजली- हे पैसे कशासाठी आहेत. घरच्यांना सांगावं लागेल मॅम.
डॉ. उज्वला- तेच कारण आहे. मी तुम्हाला सकाळी सांगितलं. .. मी इथून तेवढं सगळं बोलू शकत नाही.
अंजली- काही प्रॉब्लेम झाला का मॅम?
डॉ. उज्वला- नाही. तुम्ही इथे आल्यावर सांगते मॅम.
अंजली- ही फिस आहे का, म्हणजे मला भावाला पैशांसाठी सांगायचं आहे.
डॉ. उज्वला- सुनिताला मी सगळं सांगतिलंय.
अंजली- सुनिता… अच्छा ती ताईची… तुम्ही मला सांगा ना मॅम क्लीअर.
डॉ. उज्वला- सुनितानी पण तिला सांगितलेलं आहे.
अंजली- पण तुम्ही मला सांगा ना मॅम.
डॉ. उज्वला- तुम्हाला तर मी सगळं सांगू शकते व्यवस्थित.
अंजली- हो मॅम. कारण वहिनी खूप घाबरली. तुम्ही त्या दिवशी उगीच मॅमसमोर बडबड केली म्हणाली. ती मलाच बोलत आहे. मी म्हणलं काय झालं काय विचारते.
डॉ. उज्वला- नाही तसं काही नाही. तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल करा. अंजली- व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल का मॅम?
पीएचडीची विद्यार्थिनी अंजली घनबहाद्दर यांच्याकडून बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता या ऑडिओ क्लिपची सत्यासत्यता तपासून पाहणार आहेत. तसेच सदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागात या प्रकरणी चौकशी केली जाईल. सध्या तरी शहरात विद्यापीठातील या लाच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच लाच मागणाऱ्या विभागप्रमुखांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
इतर बातम्या-