छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) केल्याच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्र (Maharashtra) नवनिर्माण सेनेकडून महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. शहरवासियांचं स्वप्न साकार झाल्याने या रॅलीला स्वप्नपूर्ती हे नाव देण्यात आलंय. नामांतराविरोधात गेल्या काही दिवसांपासून अनेक संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतरविरोधी सूर लावून धरला आहे. याविरोधात मनसेने शहरातील नागरिकांना सोबत घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मनसेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी होय हे छत्रपती संभाजीनगरच अशा मजकुराचे बॅनर्स झळकले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातून मनसेचे कार्यकर्ते या रॅलीकरीता येत आहेत. रेल्वेने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर्स रेल्वेवर चिकटवल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ संस्थान गणपती राजाबाजार ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत भव्य स्वप्नपूर्ती रॅलीसाठी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र १६ मार्च रोजीच्या या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य किंवा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही रॅल व इतर आंदोलन करू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करु नये, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सिटी चौक पोलिसांकडून मनसेच्या या रॅलीची परवानगी नाकारण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही रॅली निघणारच आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मोर्चा काढू देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली असल्याने मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. संस्थान गणपतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मार्गात मनसेच्या वतीने हजारो बॅनर्स आणि भगवे झेंडे लावून जय्यत तयारी केली आहे. संस्थान गणपती परिसर संपूर्ण भगवामय झाला आहे. आता मनसेच्या या रॅलीत नेमकं काय होतं, याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय.