औरंगाबादः शहराच्या विकासात मोलाची भर घालण्याची क्षमता असलेल्या चिकलठाणा ते वाळूज (Chikalthana to Waluj) अखंड उड्डाण पूलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी काल नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत शहरातील या अखंड पुलाच्या DPR ला मंजुरी मिळाली. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत औरंगाबादचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad), उद्योजक विवेक देशपांचे आणि NHIचे अधिकारी यांची दीर्घ बैठक झाली. यात औरंगाबादमधील प्रमुख प्रकल्पांवर सविस्सतर चर्चा झाली. अखंड उड्डाणपूलाचा नकाशा नितीन गडकरी यांनी अगदी बारकाईने पाहिला तसेच या प्रकल्पाचा DPR तयार करण्याच्या सूचना दिल्या.
औरंगाबादच्या मध्यवर्ती असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूज असा अखंड पूल बांधण्याची केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची योजना आहे. यासंबंधीचं सूतोवाच त्यांनी अनेकदा केलं आहे. 20 किलोमीटर लांबीचा हा पूल उभारल्यास वाळूज ते शेंद्रा MIDC परिसरातील सर्व उद्योग वसाहती परस्परांशी जोडल्या जातील. तसेच दळणवळणाचा मोठा ताण कमी होईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा पुलांची उभारणी झाली आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्ये पूल उभारल्यास औद्योगिक नगरी औरंगाबादचे रुप पूर्णतः पालटेल.
हा अखंड पूल बांधण्यात मुख्य अडचण आहे, ती म्हणजे जालना रोडवर आधीच अनेक पूल आहेत. त्यात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांवर जवळपास 200 कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. मग नव्याने अखंड पूल बांधल्यास या पुलांचा पैसा पाण्यात जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मंत्री नितीन गडकरींनी यावर उपाय सूचवला आहे. शहरातले विद्यमान उड्डाणपूल चांगेल असतील तर ते वापरात आणू, अन्यथा पाडून टाकू, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीतील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे फेसबुक पोस्ट
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या या बैठकीत औरंगाबादच्या इतर प्रकल्पांवरदेखील सविस्तर चर्चा झाली. ते पुढीलप्रमाणे-
औरंगाबादमधील चिकलठाणा ते वाळूज हा अखंड पूल, तसेच औट्रम घाटातील रुंदीकरण, नगर नाका ते माळीवाडा आणि दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद किल्ली ते वेरुळ लेणी या रस्त्याच्या विकास कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. या सर्व कामांच्या माध्यमातून औरंगाबाद तसेच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. औरंगाबादच्या विकासातील हे अभिनव प्रकल्प ठरतील, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी या बैठकीनंतर दिली.
इतर बातम्या-