औरंगाबाद | मार्च महिन्यापासून शहरात सुरु झालेली तापमान वाढ (Temperature rise) स्थिरावण्याचे नाव घेत नाहीये. औरंगाबादमध्ये (Aurangabad city) वैशाख महिन्याआधीच तापामानाने 41 अंशांची पातळी गाठली आहे. मागील सात दिवस तपामान चाळीशीपर्यंत होते, मात्र शुक्रवारी त्यात आणखी वाढ होऊन शहराचे कमाल तापमान प्रथमच 41.1 अंसशांपर्यंत पोहोचले. शहरातील चिकलठाणा (Chikalthana) वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार, यंदाच्या मोसमातला हा सर्वात उष्ण दिवस ठरला. मागील दोन वर्षात 29 मे रोजी 41 अंशांवर पारा गेला होता. यंदा मात्र 20 दिवस आधीच तापमानानं ही पातळी गाठली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना संपेपर्यंत आणखी किती उष्णतेला शहरवासियांना सामोरं जावं लागेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.
शहरात सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. दुपारी 12 वाजता तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय, अशी जाणीव होतेय. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी बारा वाजेपासूनच शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वाहने अचानक कमी झालेली दिसून येत आहेत. बाजारपेठा आणि दुकानांमध्येही कमी वर्दळ पहायला मिळतेय. राजस्थानसह उत्तर भारतात उष्ण वारे वाहत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. त्यामुळे शहराच्या कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.
2 एप्रिल- 40.2 अंश सेल्सियस
3 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस
4 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस
5 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस
6 एप्रिल- 40.6 अंश सेल्सियस
7 एप्रिल- 40.8 अंश सेल्सियस
8 एप्रिल- 41.1 अंश सेल्सियस
बाहेर कडाक्याचे ऊन असताना घरात बसलेल्या नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात सर्वाधिक वीज गळती किंवा वीज बिल थकबाकी आहे, तेथे महावितरणने लोडशेडिंग केले. यात सातार परिसर, गारखेडा, पडेगाव, पेठेनगर भागात भारनियमन केले. सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्री व मध्यरात्री अचानक अर्धातास, एक तास, दोन तास असा वीजपुरवठा बंद केला. या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. काही ठिकाणी थकबाकी नसलेल्या भागातही महावितरणतर्फे भारनियमन करण्यात आले. मागणी व पुरवठ्यच समतोल राखण्यासाठी तसे केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इतर बातम्या-