औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच सिल्लोड येथील भराडी येथील जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेते श्रीराम महाजन (Shriram Mahajan) यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम महाजन आणि त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हेदेखील उपस्थित होते. महाजन यांच्यासह भराडीचे सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, विजय सांगवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीत श्रीराम महाजन यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा खुला प्रचार केला होता. त्यामुळे सत्तार आणि महाजन यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांसोबतच महाजन यांचा फोटो सोशल मीडियावर झळकला होता. तेव्हापासून महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. अखेर बुधवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
#औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रीय काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश… औरंगाबाद जि.प.चे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते श्रीराम महाजन,भाजपचे भराडी येथील सरपंच पप्पू जगनाडे, काँग्रेसचे उपसरपंच गजानन महाजन,विजय सिंगवी, दिनेश बिसेन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/pcyyPj9b37
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2022
काँग्रेसच्या तिकिटावर श्रीराम महाजन यांनी 2013 मध्ये जिल्हा परिषदेत निवडणूक लढवली. ती जिंकलीदेखील. अब्दुल सत्तारांनी त्यावेळी त्यांची थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लावली. त्यानंतर 2018 मध्ये महाजन दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी काँग्रेसच्या उमेदाराविरोधात प्रचार केला. पण महाजन हे काँग्रेससोबतच होते. त्यामुळे सत्तार आणि महाजन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. विधानसभेच्या तोंडावर सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा महाजानांनी सत्तारांविरोधात खुला प्रचार केला. त्यामुळे दोघांमधील संबंध अधिक ताणले गेले होते. अखेर श्रीराम महाजन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपण सत्तारांसोबतच असल्याचे दाखवून दिले.
इतर बातम्या-