औरंगाबाद | शहरातील कोरोना (Aurangabad corona) रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. मात्र लसीकरणाची आकडेवारी समाधानकारक नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी आग्रही भूमिका घेत महापालिकेने (Aurangabad municipal Corporation) आता दुसरा डोस न घेतलेल्या लोकांना घरी जाऊन लस देण्याचे नियोजन केले आहे. दुसरा डोस बाकी असणाऱ्या नागरिकांची यादी आरोग्य केंद्रनिहाय वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) यांना देण्यात आली आहे. तसेच रमजाननिमित्त तीन आरोग्य केंद्र आणि दोन दुकानांमध्येही सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान लसीकरण सुरु राहणार आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शनिवारी ही माहिती दिली.
औरंगाबाद शहरात लसीकरणाच टक्केवारी सरासरी 81 टक्क्यांवर पोहोचली आहे. पण पहिला डोस 90 टक्के तर दुसरा डोस 70 टक्के घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शनिवारी 40 आरोग्य केंद्रांतील डॉक्टर, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण 130 अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. रोजा असणारे नागरिक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये, यासाठी सिडको एन-8 रुग्णालय, सिल्क मिल कॉलनी रुग्णालय, कैसर कॉलनी रुग्णालय या तीन रुग्णालयात सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण सुरु ठेवण्यात येईल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
– शहरात 81.57 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर ग्रामीण भागात 82.39 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
– शहरात 60.51 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे तर ग्रामीण भागातील 59.49 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
लसीकरण वाढावे यासाठी शहरातील दोन दुकानात रात्रीच्या वेळीही लसीकरणाची सुविधा मनपा उपलब्ध करणार आहे. पैठण गेट येथील फॅशन बाजार व सिटी चौक येथील सामी कटपीस सेंटर अशा दोन ठिकाणी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल. दुसरा डोस बाकी असणाऱ्या नागरिकांची यादी आरोग्य केंद्र निहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर न येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
इतर बातम्या-