औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime News) जिल्ह्यात जनावरं चोरीचं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आता अधिकच बळावत चालला आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागात होणाऱ्या जनावरांच्या (Animal thefts in Aurangabad) चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. अशातच आता तर तब्बल 14 जनावरं चोरण्यात आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांची जनावरं चोरतानाही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यानेही टिपली आहेत. त्यामुळे आता तरी किमान जनावरं चोरणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळणार का, असा सवालही उपस्थित केला जातोय. तसंच जनावरे चोरणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी (Police News) कारवाई करावी, अशी मागणीही दूध व्यावसायिक आणि अन्य नागरिकांकडून केली जात आहे. आता समोर आलेली चोरी औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात घडली असून यावेळी तब्बल 14 जनावरं चोरट्यांनी लंपास केलीयत.
पैठण तालुक्यातील मुधलवाडी एमआयडीसी परिसरात तब्बल 14 जनावरांची चोरी करण्यात आली. जनावरे चोरून गाडीत भरून नेत असतानाचा चोरीचा CCTV व्हिडीओही आता समोर आली आहे. एका टेम्पोत ही जनावरं भरली गेली. मोकाटपणे कोणाचंही भय नसल्याप्रमाणे चोरटे जनावरांना गाडीत भरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलंय. 2 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान कुणीही नाही हे पाहून चोरट्यांनी डाव साधल्याचं दिसून आलंय.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात होणाऱ्या या चोरीमुळे दुग्ध व्यवसायिक संकटात सापडला आहे. जनावरांची चोरी करणाऱ्यांमुळे दूधदुभती जनावरं असलेले शेतकऱ्यांना चिंता सतावू लागलीय. जनावरांना चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतेय. त्यातच या टोळीच्या मुसक्या आवळण्याचं आव्हानं आता औरंगाबाद पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरीसाठी वापरली जाणारी गाडी आणि चोरटे यांची ओळख पटवण्याचंही काम सुरु आहे. या चोरट्यांना आता केव्हा अटक होते, याकडे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांचं लक्ष लागलंय.