औरंगाबादः शहरातील चिकलठाणा विमानतळाच्या (Aurangabad Airport) नामांतरावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे. विमानतळ नामांतराची प्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र कालच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khire) यासंदर्भातली विनंती करण्यासाठी केंद्रीय विमान उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. याविषयी डॉ. कराड यांना विचारले असता, खैरे यांना याबद्दल काहीही माहिती नाही. औरंगाबादसह देशातल्या 13 विमानतळांची नावं बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर डॉ. कराड प्रथमच औरंगाबादेत आले. यानिमित्त औरंगाबादकरांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितले की, औरंगाबादसह देशातील इतर 13 विमानतळांचे लवकरच नामांतर होणार आहे. यात औरंगाबाादसह, कोल्हापूर, शिर्डी अशा एकूण 13 विमानतळांचा समावेश आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनानकडे पाठवण्यात आला असून येत्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या संबंधीचा एकत्रित प्रस्ताव विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लवकरच कॅबिनेटसमोर ठेवणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाला नागरी उड्डयन मंत्रालयाने ही प्रस्तावाची माहिती दिली आहे, असे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
21 नोव्हेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विमान उड्डयन मंत्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते औरंगाबादमधील विमनातळाचे उद्घाटन झाले. त्यानंतर भाजप, शिवसेनेसह शहरातील विविध पक्षांनी विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. अखेर 05 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र मंत्री मंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे औरंगाबादचे एक लोकप्रिय नेतृत्व आहे. यंदा प्रथमच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत त्यांना देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. संपूर्ण औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी ही भूषणावह बाब ठरली. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काल प्रथमच डॉ. कराड यांचे शहरात आगमन झाले. यावेळी भाजप नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
इतर बातम्या-