औरंगाबादः कुणीही काहीही केलं तरी शिवसेनेला (ShivSena) काहीही फरक पडणार नाही. दंगल असो किंवा इतर कुठली आपत्ती, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जे मुंबईसाठी केलंय ते कुणीही विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला (MNS) उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील अनेक विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हाताने होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी शिवसेना आणि मुंबईचे नाते अगदी मजबूत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथील समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. नागपूर ते मुंबई या सर्वोच्च गतीमान असलेल्या महामार्गाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या मे महिन्यात या महामार्गातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री शिंदे यांनी मुंबई ते औरंगाबाद या हवाई प्रवासाचा मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर ठेवून पाहणी केली. तसेच समृद्धी महामार्गावर हेलीपॅड तयार करून त्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरवण्यातदेखील आले होते.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या 2 मे रोजी होईल, अशी माहितीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जालना ते शिर्डी या टप्प्याचेही बांधकाम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात हा टप्पाही लोकांसाठी खुला केला जाईल, असे ते म्हणाले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यात 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जी टीका केली, त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.
इतर बातम्या-