औरंगाबाद | जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणींजवळील (Ellera caves) जैन कीर्तिस्तंभ हटवण्यात येणार नाही, अशीग्वाही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी(G Kishan Reddy) यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. औरंगाबादमध्ये मागील काही दिवसांपासून या कीर्तिस्तंभाच्या हटवण्याचा वाद सुरु होता. त्यामुळे जैन समाजात प्रचंड अस्वस्थता होती. लेणींजवळील जैन कीर्तिस्तंभ काढून टाकण्यासंबंधीचे पत्र पुरातत्त्व विभागातर्फे जैन समाजाला पाठवण्यात आले होते. त्यानंतर जैन समाजाने प्रचंड संताप व्यक्त केला होता. मात्र या स्तंभामुळे लेणीसमोरील रस्त्यात अडथळे येत असून अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचे पुरातत्त्व विभागाने (Archeological Survey of India) म्हटले होते. हा स्तंभ तसाच ठेवू, त्याचे स्थलांतर करून इतर ठिकाणी हलवू, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले होते. मात्र स्तंभ आहे तिथेच ठेवावा, अशी जैन संघटनांनी मागणी केली होती. अखेर केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडल्याचे चित्र आहे.
भागवान महावीरांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त 1974 मध्ये देशभरात जैन कीर्तिस्तंभ उभारण्यात आले होते. त्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला होता. तत्कालीन आयुक्त बी.के. चौगुले यांनी वेरूळ, कन्नड आणि बाबा पेट्रोलपंप येथे स्तंभाला मंजुरी दिली होती. सकल जैन समाजाच्या सहकार्याने तो उभारण्यात आला. दरवर्षी महावीर जयंतीनिमित्त येथे ध्वजारोहण, मिरवणूक आणि सद्भावना कार्यक्रम होतात. 48 वर्षानंतर हा स्तंभ काढणे चुकीते आहे. हे कुणाच्या जागेवर अतिक्रमण नसल्याने तो आहे त्याच जागेवर ठेवावा आणि त्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी भूमिका पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांड यांनी मांडली होती. त्यानंतर जैन संघटनांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. तेव्हा खैरे यांनीही जैन संघटनानांना हा स्तंभ हलवू देणार नाही, असे आश्वासन दिले होते.
वेरुळ लेणी परिसरातील या स्तंभामुळे फेरीवाल्यांना अडथळा निर्माण होतो. या स्तंभामुळे अपघात झाले आहेत, तसेच वेरूळ येथील लेण्या हिंदू, जैन आणि बौद्ध या तीन धर्मांचे प्रतिनिधित्व करत असताना हा स्तंभ केवळ जैन या एकाच धर्माचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे हा स्तंभ हटवण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली. दरम्यान, विविध जैन संघटनांनी विचार विनिमय करून अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक कार्य व पर्यटनमंत्री जी. किशनरेड्डी यांनी हैदराबाद येथे नुकतीच भेट घेतली. यावेळी रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील, असा कोणताही निर्णय पुरातत्त्व विभागातर्फे घेतला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच यासंबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
इतर बातम्या-