औरंगाबादः आम्ही सत्तेत आलो तर काळा पैसा बाहेर काढू, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान जनधन (Jandhan Yojna) योजना सुरु करण्यात आली. याअंतर्गत एखाद्या योजनेचा लाभ द्यायचा असल्यास, सदर पैसे शेतकरी किंवा लाभार्थ्याच्या खात्यातच जमा होतात. अद्याप नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानुसार 15 लाख रुपये कुणाच्या खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र औरंगाबाबाद जिल्ह्यातील (Aurangabad farmer) एका शेतकऱ्याच्या खात्यात चार महिन्यांपूर्वी 15 लाख रुपये जमा झाले. पंतप्रधानांनी आश्वासन पाळलं म्हणून पठ्ठ्याने त्यांना आभाराचा ईमेलदेखील पाठवला. पुढे काय काय घडलं ते पाहणं तर आणखीच आश्चर्यकारक आहे. औरंगाबादमध्ये नुकतीच या घटना समोर आली आहे.
झालं असं की, औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील दावरवाडी गावात शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन औटे हे राहतात. हे गाव पिंपळवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येतं. ज्ञानेश्वर यांनी बँक ऑफ बडोदा येथे जनधन खाते उघडलेले आहे. 17 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या खात्यात 15 लाख 34 हजार 624 रुपये जमा झाले. खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा सुरु झाली. अखेर पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन पाळले, त्याचेच हे पैसे असल्याचे मानत ज्ञानेश्वर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. ज्ञानेश्वर यांनीही खरेच असे असेल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका ईमेलद्वारे आभार मानले.
हे पैसे आपल्यालाच मिळाल्याचे वाटल्याने ज्ञानेश्वर यांनी 9 लाख रुपये काढले. त्यात घरही बांधले. मात्र अचानक हे पैसे नेमके कुठून आले, हे कळले. त्यानंतर मात्र शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हा पैसा आपला नव्हता, आपण तर त्यावर घरच बांधून काढले, या चिंतेने त्याला ग्रासले. आता एवढा खर्च केलेला पैसा पुन्हा कसा परत करायचा? असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.
हे पैसे मोदींनी ज्ञानेश्वर यांना पाठवले नव्हते तर नेमके कुणाचे होते, हा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर हे पैसे होते ग्रामपंचायतीचे. 15 व्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळणारे हे पैसे बँकेच्या चुकीने शेतकऱ्याच्या खात्यावर जामा झाले. त्यानंतर तब्बल 4 महिन्यानंतर ग्रामपंचायतीला ही चूक लक्षात आली. बँक खाते क्रमांकात केवळ एका नंबरच्या चुकीने हा सगळा घोळ झाला. आता ज्ञानेश्वर यांनी पैसे परत करावे, असे पत्र पाठवण्यात आले आहे. तत्पूर्वी बँक ऑफ बडोदातर्फेही पत्र आल्यानंतर ज्ञानेश्वर यांना सगळा प्रकार कळला. आता ही रक्कम परत कशी करायची, हा प्रश्न ज्ञानेश्वर समोर आहे.
ग्रामसेवक बाळकृष्ण गव्हाणे म्हणतात, शेतकऱ्याच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम जमा झाली तेव्हा त्याने बँक किंवा पोलिसांना सांगणे आवश्यक होते. आता ही रक्कम त्याने परत करावी, अव्यथा आम्ही गुन्हा दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ज्ञानेश्वर यांनी 9 लाखांची रक्कम तर वापरली आहे. उर्वरीत 6 लाख रुपये आणि त्या आधी खर्च केलेली रक्कम हफ्ता-हफ्त्याने परत करू असे आश्वासन ज्ञानेश्वर यांनी दिले आहे.
इतर बातम्या-