औरंगाबादः वारंवार उद्भवणाऱ्या नापिकीमुळे नैराश्य आल्याने शेतकरी पत्नीने (Farmer Wife Suicide) आयुष्यच संपवल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत घडली आहे. जिल्ह्यातील सोयगावातील (Aurangabad Soygaon) डाभा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. मंदाबाई मनोबर दांडगे असं शेतकरी पत्नीचं नाव असून शनिवारी रात्रीतून त्या घरातून गायब झाल्या. रविवारी सकाळी कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली असता, शेतातील विहिरीत मंदाबाई यांचा मृतदेह तरंगत (Suicide in Well) असलेला आढळून आला. कुटुंबियांनी सदर घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याविषयी सोयगावचे स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी पत्नी असलेल्या मंदाबाई मनोहर दांडगे यांच्या पतीच्या नावे डाभा शिवारातील गट क्रमांक 5 मध्ये शेती आहे. त्यांच्या पत्नीने ग्रामीण बँक व बुलडाणा येथील बँक यांचे कर्ज घेतलेले होते. शेतात सतत नापिकी होत असल्याने हे कर्ज आपल्या नवऱ्याने कसे फेडावे याबद्धल घरात रोजच किरकिर होत असे. घरातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर होते. त्यात कोरोना संकटामुळे घरात कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही, काय करावे समजत नसे. या दररोजचच्या कटकटीतून परमेश्वर तरी बाहेर काढेल व मार्ग निघेल, या विचारात मंदाबाई असायच्या, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान, मार्च महिना असल्याने बँकेनेही कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला होता. या विषयावर घरात रोजच चर्चा चालायची परंतु उत्तर काहीच मिळत नव्हते. त्यातच घरात लग्नाच्या वयाचा मुलगा असल्याने त्याच्या लग्नाचेही टेंशन होते. अखेर गरीबीमुळे स्वतःला संपवून टाकण्याचे विचार मंदाबाई करायच्या, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
मंदाबाईंनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी 12 मार्च रोजी रात्री घरातील सर्व जण झोपेत असताना, कर्जाला कंटाळून मंदाबाई हिने डाभा शिवारातील गट क्रमांक 54 मधील विहीरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना सकाळी त्यांच्या मुलास रविवारी सकाळी शोधाशोध केली असता समजली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस स्टेशन एपीआय अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पंचनामा केला करण्यात आला. तसेच सावळद बारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पीएसआय कासले व पो. हवालदार बागुलकर रवींद्र करीत आहेत.
इतर बातम्या-