औरंगाबादः पर्यटन नगरी (Aurangabad Tourism) म्हणून राज्यात मान असलेल्या औरंगाबाद नगरीत आता 22 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. वेगानं विकास करणारे आशिया खंडातील शहर अशी ख्याती असलेल्या औरंगाबादेत आता मुंबई, पुण्याप्रमाणे गगनचुंबी इमारत (Sky touching Building) पहायला मिळतील, असे संकेत आहे. शहराच्या सातारा परिसरात गट नंबर 39 मधील अडीच एकर जागेवर ही इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. शहरात आतापर्यंत फक्त 15 मजली एवढी उंच इमारत बांधम्यात आलेली आहे. आता सातारा परिसरात 22 मजली इमारतीचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेकडे (Aurangabad Municipal Corporation) परवानगीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्सला परवानगी दिली आहे. या नियमावलीत शासनाने अमूलाग्र बदल केले आहेत. पूर्वी औरंगाबाद शहरात 46 मीटरपर्यंत उंच इमारतींना परवानगी देण्यात येत होती. आता शासनाने 70 मीटरपर्यंतची मुभा दिली आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार, शहरात प्रथमच एमएमटी इन्फ्रास्ट्रक्चरने पुढाकार घेतला आहे. सर्वात उंच इमारत बांधण्यासाटी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिकेतील नगररचना विभागातील उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी ही माहिती दिली.
– बीड बायपास जवळील सातारा परिसरातील गट क्रमांक 39 मध्ये हे सिंगल टॉवर उभारण्याची योजना आहे.
– सातारा परिसरातील 2.5 एकर जागेवर ही इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे.
– 46 मीटर उंचीपर्यंत सध्या इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता ही नव्या इमारतीसाठी 70 मीटर उंचीची परवानगी मागण्यात आली आहे.
– या बिल्डिंगमध्ये 88 थ्री बीएचके फ्लॅट बांधण्याची बिल्डर्सची योजना आहे. यात सर्व सोयी सुविधा असतील, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने 70 मीटरपर्यंत बांधकामांना परवानगी दिली असली तरी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे पाचव्या मजल्यावर आग विझवण्यासाठी अत्याधुनिक लॅडर नाहीत. मागील दहा वर्षांपासून अग्निशमन विभाग आधुनिक यंत्र सामग्रीची मागणी करत आहे. मात्र आजपर्यंत याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. भविष्यात 22 मजल्यांच्या इमारतीत काही दुर्घटना घडल्यास त्यासाठी महानगरपालिकेकडे एवढी सक्षम यंत्रणा आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
इतर बातम्या-