औरंगाबाद | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच औरंगाबादचे (Aurangabad) माजी नगरसेवक चेतन कांबळे (Chetan Kamble) यांनीही राऊत यांच्या समर्थनार्थ मोठी जाहिरातबाजी केली आहे. चेतन कांबळे हे प्रत्यक्ष शिवसेनेचे सदस्य नाहीत किंवा औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांशीही त्यांची फारशी जवळीक नाही. मात्र संजय राऊत यांचे ते अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच ईडीने संजय राऊत यांच्या मालमत्तांवर टाच आणल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केलाय. औरंगाबादमधील दैनिकामध्ये त्यांनी शुक्रवारी पानभर जाहिरात छापून हा ईडीचा नव्हे तर रडीचा डाव आहे, भाजपाला तो परवडणारा नाही, असा इशारा दिला आहे. चेतन कांबळे आणि संजय राऊत यांचं राजकीय कनेक्शन ठाऊक असल्याने औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात या जाहिरातीची आज चांगलीच चर्चा सुरु आहे.
औरंगाबादचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शहरातील दैनिकात मोठी जाहिरात दिली आहे. त्यातील निवडक मजकूर पुढील प्रमाणे-
हा ईडीचा नाही तर रडीचा डाव आहे. इतिहास साक्षी आहे, सूडाचे राजकारण केव्हाही उलटू शकते. या देशातील जनता सुजाण आहे. मआता राजेशाही संपुष्टात आली असून जनता राजा आहे, याची प्रचिती भारतीय जनतेने वेळोवेळी दिली आहे. संजयजी राऊत यांनी भाजपसोबत जाण्यास स्वारस्य दाखवले नाही. या एकाच कारणाने केवळ त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाहीये, तर आपल्या वैचारिक भूमिकेत जो क्रांतिकारी बदल केला, त्यामुळे सत्ताधारी-विषमतावादी प्रवृत्तींचे पित्त खवळले आहे. हे सूडाचे राजकारण थांबवा. सूडाच्या राजकारणाविरोधात देशातील सर्व न्यायप्रिय जनता पेटून उठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जाहिरातीतून चेतन कांबळे यांनी दिला आहे.
औरंगाबादचे माजी नगरसेवक चेतन कांबळे हे भीमशक्ती विचारमंच तथा शिवसेनेचे नगरसेवक आहेत, असे त्यांनी जाहिरातीत नमूद केले आहे. भावसिंगपुरा येथील ते स्वीकृत नगरसेवक आहेत. औरंगाबादमधील अनेक सामाजिक प्रश्नांविरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे. अनेक जनहित याचिकाही दाखल केलेल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या काळापासून संजय राऊत आणि चेतन कांबळे यांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत. एवढंच नाही तर 1999-2004 या काळात राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना संजय राऊत यांच्या पाठिंब्यानेच चेतन कांबळे यांनी औरंगाबादेत पेट्रोल पंप मिळवण्यासाठी मोठा वाद निर्माण केला होता, असं राजकीय जाणकार सांगतात.
इतर बातम्या-