औरंगाबादः औरंगाबाद शहरातील बहुचर्चित गॅस पाइपलाइनच्या (Gas Pipeline) कामाचा शुभारंभ येत्या 2 मार्च रोजी होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी दिली आहे. शहरातील नॅचरल गॅसचा तुटवडा कमी करण्यासाठी शहरात पीएनजी योजना राबवली जाणार आहे. या कामाचा शुभारंभ येत्या 2 मार्च रोजी सकाळी केंद्रीय पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस व शहर विकास मंत्री हरदीप सिंह पूरी (Hardeepsingh Puri) यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे, पाइपलाइनद्वारे मिळणारा गॅस सध्याच्या सिलिंडरमध्ये मिळणाऱ्या गॅसपेक्षा कमी दरात असेल, असं आश्वासन डॉ. कराड यांनी दिलंय.
गॅस पाइपलाइनमुळे फक्त औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती वापरासाठीचा गॅस, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस पाइपलाइनद्वारे पुरवला जाईल. पीएनजी गॅस हा पर्यावरण पूरक आहे. तसेच हा गॅस लिक झाल्यावर तत्काळ हवेत विरघळतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता कमी आहे. शहरातील गॅस पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ येत्या 2 मार्च रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप पूरी यांच्या हस्ते होईल, तसेच शहरातील सर्व आमदार आणि खासदार, नेते, अधिकारी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात गॅसची पाइपलाइन आल्यानंतर गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्यांचा रोजगार बुडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र यावर उत्तर देताना डॉ. भागवत कराड म्हणाले, शहरात एकूण 27 गॅस एजन्सी आहेत. यातील लोकांना इतर कामे दिली जातील. उदाहरणार्थ, गॅस मीटर रीडिंग, बिलिंग आदी. त्यामुळे कुणाच्याही पोटावर पाय येणार नाही, याउलट रोजगार वाढतील, असं आश्वासन डॉ. कराड यांनी दिलं.
इतर बातम्या-