MIM चे बॅनर रातोरात काढले, महापालिका सुटीच्या दिवशीही सक्रिय, एमआयएमचा आरोप, औरंगाबादेत ‘घरकुल’ पेटले!

| Updated on: Feb 07, 2022 | 4:32 PM

केंद्रातील भाजपला श्रेय मिळू नये म्हणून जिल्ह्यात शिवसेना घरकुल योजनेसाठी जागाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप भाजपने केला. तसेच केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी शिवसेनेनेच खासदारांना फूस लावल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

MIM चे बॅनर रातोरात काढले, महापालिका सुटीच्या दिवशीही सक्रिय, एमआयएमचा आरोप, औरंगाबादेत घरकुल पेटले!
महापालिकेने रातोरात बॅनर्स काढले
Follow us on

औरंगाबादः शहरात पंतप्रधान आवास योजनेचे काम ठप्प असल्याचा आरोप करत एमआयएमने औरंगाबादेत बॅनरबाजी केली. शहरातील प्रमुख ठिकाणी एमआयएमने (Aurangabad MIM) हे पोस्टर्स रविवारी झळकवले. केंद्र सरकारची ही योजना औरंगाबादेत अपयशी ठरल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला असून याची बदनामी उत्तर प्रदेशातही करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र औरंगाबादेत लावण्यात आलेले हे बॅनर महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) निम्म्या रात्रीतून काढून टाकले. शहरात कोणत्याही राजकीय पक्षांचे बॅनर लावू नयेत, असा महापालिकेचा नियम आहे. मात्र या नियमाची अंमलबजावणी ठराविक वेळेलाच होताना दिसते. पण एमआयएमचे बॅनर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सुटीच्या दिवशीही आल्याचा आरोप एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे. आता घरकुल योजनेचा (Gharkul Scheme) हा मुद्दा आणखी आक्रमकपणे लावून धरणार असल्याचा इशारा एमआयएमने दिला आहे.

काय आहे नेमका मुद्दा?

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना अर्थात घरकुल योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात अगदी मोजकीच घरे नागरिकांना मिळाली असल्याचा खुलासा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी केला. जिल्ह्यात 88 हजार अर्जदारांपैकी फक्त 355 अर्जदारांनाच घरकुल मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ही योजना राबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत एमआयएमने रविवारी ‘पंतप्रधान फेककुल योजना’, स्वप्नातलं घर स्वप्नातच असे उपरोधिक बॅनर औरंगाबादमध्ये झळकावले. मात्र महापालिकेने ते रातोरात काढून टाकले.

खासदारांना शिवसेनेची फूस- भाजप

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी घरकुल योजनेचा हा मुद्दा लावून धरण्यामागे शिवसेनाच असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते संजय केणेकर पत्रकार परिषद घेतली होती. योजना केंद्र सरकारची असली तरीही केंद्रातील भाजपला श्रेय मिळू नये म्हणून जिल्ह्यात शिवसेना घरकुल योजनेसाठी जागाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप भाजपने केला. तसेच केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी शिवसेनेनेच खासदारांना फूस लावल्याचा आरोप भाजपने केला आहे.

एकूणच, एमआयएमने लावून धरलेला हा मुद्दा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे दिसतेय.

इतर बातम्या-

एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न

Valentine’s Day च्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पुण्यातील गुलाब उत्पादकांसाठी घेऊन आले अच्छेदिन…! निर्यातीत मोठी घट