औरंगाबाद : शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांच्या कारखान्यातील घोटाळा प्रकरणी चुकीचा अहवाल द्यावा यासाठी सीएला मारहाण करणं आता गवळींच्या अंगलट येणार असं दिसतंय. सीए उपेंद्र मुळे यांनी वारंवार तक्रार करुनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप करत थेट औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयाने औरंगाबाद पोलिसांना जोरदार झटका दिलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर काय कारवाई केली याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे आता न्यायालय पुढील काळात काय आदेश देतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेय.
औरंगाबाद शहरातील सीए उपेंद्र मुळे यांना भावना गवळी यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने औरंगाबाद पोलिसांना सीएने दिलेल्या तक्रारीनंतर काय कारवाई केली याबाबतची माहिती शपथपत्रद्वारे सादर करण्याचे आदेश दिलेत.
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
सीएने या प्रकरणात चुकीचा अहवाल देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना गुंडाकडून मारहाण करत दबाव टाकण्यात आला. या मारहाणीनंतर सीए उपेंद्र मुळे यांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी दिल्या. मात्र, पोलिसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सीए उपेंद्र मुळे यांनी हायकोर्टात धाव घेतली. शेवटी हायकोर्टाने पोलिसांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.